दिपाली जगताप
युवा पत्रकारिता पुरस्कार
2023
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या दिपाली जगताप यांनी सामाजिक विषयात रस असल्यामुळे पत्रकारिता क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. पत्रकारितेचे शिक्षण झाल्यानंतर लगेच २००९ मध्ये आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत सात महिने ट्रेनी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी “मी मराठी” या वाहिनीत काम केले. त्या नंतर जवळपास ९ वर्षे झी 24 तास या वृत्तवाहिनीत रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केले. शिक्षण, आरोग्य, महिलांचे विविध विषय, बाल हक्क, आदिवासी भागातील समस्या हे विषय त्यांनी हाताळले.
दिपाली २०२० पासून ते आजतागायत त्या बीबीसी या वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत. बीबीसी न्यूजसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये त्यांनी रिपोर्टींग केले आहे. मेळघाट, नंदुरबार, पालघर, शहापूर, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी, यवतमाळ या भागांमध्ये जाऊन बातमीदारी केली. प्रत्येक रिपोर्ट्समधून त्यांनी गरीब, सामान्य लोकांच्या समस्या, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या रिपोर्ट्सनंतर संबंधितांना मदत मिळू शकली, सरकारी स्तरावर हालचाली झाल्या आणि अनेकदा रिपोर्टनंतर त्या ठिकाणची परिस्थिती बदलली याचं समाधान आहे, अशा भावना दिपाली यांनी व्यक्त केल्या. याच प्रेरणेतून त्यांचा पत्रकारीतेचा प्रवास चालू आहे.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. देशपातळीवरचा 'लाडली जेंडर सेंसिटिव्हिटी पुरस्कार', मराठी भाषा अभ्यास केंद्राचा 'दिनू रणदिवे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, नवभारत टाईम्सचा स्त्री शक्ती पुरस्कार, नाशिक पत्रकार संघाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले.
तुमचे पत्रकारिता क्षेत्रातले कार्य असेच वृद्धिंगत होत राहो, या सदिच्छा !
दिपाली जगताप यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.