मुंबई - देशभरातील आरोग्य व्यवस्था सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी आरोग्य सेवाबचे सुलभीकरण आणि लोकशाहीकरण होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. अभय बंग यांनी मांडले. यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले, श्री. विवेक सावंत, चव्हाण सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, विश्वस्त अजित निंबाळकर, राजेश टोपे, दिलीप वळसे - पाटील, बी.के. अगरवाल, डॉ. समीर दलवाई, रामदास भटकळ, शिक्षण तज्ज्ञ फरीदा लांबे, चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. बंग बोलत होते, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारताना मनामध्ये थोडीशी धाकधूक आहे. कारण, आजपर्यंत या पुरस्कारांच्या यादीमध्ये अनेक दिग्गज मान्यवरांचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज माणसाच्या नावाने हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आहे आणि त्यांचे वारस म्हणून ज्यांना मानलं जातं, त्या शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतोय, याचा वेगळा आनंद आहे. म्हणून या राष्ट्रीय पुरस्काराचा आम्ही दोघेही कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो. गडचिरोली सारख्या भागात स्टीलचा उद्योग सुरू होत आहे. किती चांगली लोहखनिज मिळते. त्यामुळे उद्योगधंद्यांच्या बाबतीत तेथे अनेक बदल होत आहेत. या बदलांच्या विरोधात आम्ही नाही. मात्र, तेथील आदिवासी बांधवांचे काय? त्यांच्या मूलभूत प्रश्नांचे काय? त्यांच्या रोजगाराच काय? त्यांच्या शिक्षणाचे काय? किती आदिवासी बांधवांना तेथे रोजगार मिळू शकेल? असेही काही मूळ प्रश्न आहेत. यावरही सकारात्मक चिंतन किंवा विचार विनिमय होणे गरजेचे आहे. अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
पुरस्काराचे मानकरी ठरविण्यासाठी, विख्यात अणुशास्त्रज्ञ, डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये SNDT विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. रूपा शाह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, अर्थशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत श्री. विवेक सावंत, आर्किटेक्ट आय.एम. काद्री हे सदस्य म्हणून काम पाहतात. रु. ५ लाख, मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. अनिल काकोडकर यांनी पुरस्कारासंबंधीची माहिती दिली. संशोधक, सामाजिक कार्यकर्ता, गांधीवादी विचारांचा मिलाप असणारे डॉ. अभय बंग हे आदिवासींसाठी विधायक काम करत आहेत. सोबतीला त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग या देखील आहेत. या दोघांना देखील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, असे सांगून डॉ. काकोडकर यांनी बंग दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार म्हणाले की, डॉ.राणी बंग व डॉ.अभय बंग यांच्या कामाची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. त्यामुळे त्यांच्या सारख्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या दांपत्याला आज कृतज्ञता म्हणून यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दिला जात आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉ.राणी बंग उपस्थित राहू शकल्या नाहीत. पण, त्यांचा संदेश आपण ऐकला. त्यात त्यांनी हा पुरस्कार सर्व लोकांचा आणि या सगळ्या प्रवासात सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, आज डॉ.राणी बंग आणि डॉ.अभय बंग पती-पत्नीला हा पुरस्कार दिला जात आहे. तोही यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने. त्यामुळे ही निवड अतिशय सार्थ आहे, असे मला वाटते. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला. महाराष्ट्राचा चेहरा कसा बदलता येईल? हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे महाराष्ट्राला आणि देशाला दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार योग्य व्यक्तींना दिला जात आहे, याबद्दल निवड समितीचा आभारी आहे. चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष श्री. अरुणभाई गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सेंटरचे सरचिटणीस, हेमंत टकले यांनी पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.