यशवंतराव चव्हाण सेंटरच्या युवा विभागाच्या वतीने दरवर्षी “अभिसरण - युथ एक्सचेंज प्रोग्राम” आयोजित केला जातो. यावेळी कोकण ते मराठवाडा असा हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

नाव नोंदणी करण्यासाठी

हा उपक्रम आहे तरी काय?

वैविध्यपूर्ण आणि संपन्नतेने नटलेल्या या महाराष्ट्रातील युवांनी, आपला परिसर सोडून मराठी मुलुखाच्या कानाकोपर्‍यात जावून तेथील माहीती तसेच तेथील आचार-विचार, भाषा, आवडी-निवडी, सवयी, व्यवहार, संस्कृती यांचे आदान-प्रदान करण्याची एक जाणीव प्रक्रिया म्हणजे युवा अभिसरण होय.

संकल्पना

आपल्या महाराष्ट्र वैविध्यपूर्ण आणि संपन्नतेने नटलेला असा हा मुलुख आहे. या बद्दल बोलायचे झाले तर वेळ आणि जागा कमी पडेल. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक भूभागाचे एक वेगळेपण आहे. बोलीभाषा, बोलण्याची लकब, पेहराव, खाद्यसंस्कृती, आदराथित्य, पारंपारिक शेतीपद्धती, पारंपारिक व्यवसाय व उद्योगधंदे तसेच भौगोलिक, सामाजिक आणि राजकिय परिस्थिती त्याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते अगदी इथल्या निसर्गामध्येही हे वेगळेपण जाणवते. ही महाराष्ट्रभूमी संतांची, सुधारकांची, शुरांची अन् वीरांची, कलावंतांची अन् साहित्यिकांची, कष्टकर्‍यांची अन् शेतकर्‍यांची, उद्योजकांची अन् राज्यकर्त्यांची…! या सर्व गोष्टी जाणून घेण्याने, जोपासल्यामुळे आपली मराठी अस्मिता टिकेल असे आम्हाला वाटते. महाराष्ट्र राज्याची पन्नास वर्षे उलटून गेली तरीही हे सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी, जोपासण्यासाठी काही ठोस उपक्रम हाती घेण्याचे सोडून आपणा मात्र ‘प्रयत्न करायला पाहीजे’ अशीच भाषा करतोय. प्रांतवाद किंवा भाषावाद उकरुन हीच मराठी अस्मिता हिंसक मार्गाने रस्त्यावर आणण्यापेक्षा आता ही मराठी मने या मराठी मातीशी जोडण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. ही गरज जाणून आणि महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या युवा विभागाने युवा देशाच्या युवा राज्यातील युवांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आणि सुरु केला अनोखा उपक्रम... युवा अभिसरण…!