मनिषा सजनपवार

यशस्विनी कृषी सन्मान
पुणे
२०२५

मनिषा सजनपवार या गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला येथील पदवीधर असून, त्यांनी ‘विघ्नहर्ता महिला गृहउद्योग’ या नावाने फळ प्रक्रिया उद्योग सुरू केला. मोह, जवस, भुइमुग, मोहा, करंज, मोहरी, काळे तीळ, पांढरे तीळ यांच्यापासून लाकडी घाण्यावर त्या तेलाची निर्मिती करतात तसेच विविध प्रकारची लोणची, आम्बाली सरबत,मोहा सरबत तयार करत त्या जिल्ह्यातील महिलांना व्यवसायासाठी प्रेरित करतात. त्यांनी विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून बचत गट तयार केले आणि कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनात कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती आणि सेंद्रिय शेती असे व्यवसाय उभारले.

त्यांच्या चार एकर शेतीत तांदूळ हे मुख्य पीक आहे. त्या तांदूळ, तूर दाळ आणि विविध पदार्थ बनवून विकतात. गडचिरोली हर्बल क्लस्टरच्या माध्यमातून हिरडा, बेहडा, आवळा, कडूनिंब, पळस फूल यांसारख्यावर प्रक्रिया करून पावडर आणि तेल तयार करतात. या क्लस्टरमध्ये एकूण १८० महिला असून त्यापैकी १५० आदिवासी महिला आहेत. मनिषा यांनी १२ बचत गट तयार करून गावातील महिला-पुरुषांना शेती उत्पादनांवर प्रक्रिया आणि विक्रीसाठी प्रोत्साहित केले आहे.

प्रशिक्षणातून त्यांनी लोणच्याची शेल्फ लाइफ वाढवण्याचे तंत्र शिकले, ज्यामुळे बाजारात मागणी वाढली. त्यांचे पती, मुलगा, कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करून त्या आजही जोमाने कार्य करीत आहेत.

त्यांना स्त्री शक्तीचा उत्सव (२०१४), दत्ता मेघे पुरस्कार (२०१५), आदिवासी शोध यात्रा (२०१९), आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती (२०२५) यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मनीषा यांनी उद्योजकतेचा नवा मार्ग आखला आणि अनेक महिलांना सशक्त केले.

जंगल आणि जमीन यांची सेवा करणाऱ्या मनिषा सजनपवार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी कृषी सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery