मुंबई, 27 सप्टेंबर: वडील भंवरलाल यांच्यासोबत कविवर्य ना. धों. महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार असायचे तेव्हा तर जणू दुग्धशर्करा योग जुळून येत होता. शेतकऱ्यांचे जीवन उत्तम कसे होईल आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसे हास्य फुलेल, यासाठी महानोर काम करत राहिले. ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. कविता, साहित्य, चित्रपटगीते लिहिताना त्यांनी शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य केले, असे गौरोद्‌गार जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

कविवर्य महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या दोन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवांना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी पालघर येथील साधना उमेश वर्तक, नंदुरबार येथील कुसुम सुनील राहसे यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार तर चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर, बुलढाणा येथील वैभव देशमुख, मराठवाडा येथील सुचिता खल्लाळ, पुणे येथील हिना कौसर खान यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

समारंभाच्या निमंत्रक चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, कविवर्य महानोर आणि पवार कुटुंबामध्ये असलेले चार दशकातील घनिष्ट नाते विचारात घेऊन ना. धों. महानोराचे कार्य पुढे नेण्याचा चव्हाण सेंटरचा प्रयत्न आहे. ना.धों. महानोर साहेबांची पूर्ण माहिती देणारी एक समग्र वेबसाईट तयार करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर महानोर यांचे वास्तव्य असणारे गाव एक स्मारक रुपात तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

ना. धों. महानोर यांचे कुटुंबीय, चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, सरचिटणीस हेमंत टकले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त विवेक सावंत, जैन फाउंडेशनचे पदाधिकारी, तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.

उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.