मुंबई : समाजहितासाठी प्रशासन, माध्यमे आणि राजकारण्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याची गरज आहे. या तिघांनी एकत्र काम केल्यास समाजव्यवस्थेचा हास होतो. भ्रष्टाचार वाढतो आणि अखेरीस समाजाचे मोठे नुकसान होते, असे प्रतिपादन 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.

एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत शरद काळे स्मृती व्याख्यानात 'प्रशासन, माध्यमे आणि राजकारण : नवे समीकरण' या विषयावर कुबेर बोलत होते. धर्मसत्तेकडून होणाऱ्या लैंगिक शोषणावर प्रहार करणाऱ्या 'स्पॉट लाईट' या चित्रपटातील एका प्रसंगाचा दाखला कुबेर यांनी दिला, चुकीच्या गोष्टी दडपण्यासाठी संपादकांवर माध्यम, प्रशासन आणि धर्मसत्तेने एकत्रपणे काम करण्यासाठी दबाव आणला जातो. पण, संपादक या तिघांनी एकत्रपणे काम न करता स्वतंत्रपणे काम करण्याची गरज असल्याचे अत्यंत ठामपणे सांगतात. आज आपल्याकडेही याची निकड जाणवते. प्रशासनातून निवृत्त होऊन किंवा राजीनामा देऊन एखादा अधिकारी थेट निवडणूक लढवितो. सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होताच एखाद्या लहान राज्याचे राज्यपाल होतात. एखादा पोलीस अधिकारी राजीनामा देऊन थेर निवडणूक रिंगणात उतरतो आणि एखाद्या वृत्तपत्राचा संपादक निवृत्त होताच राज्यसभेत सदस्र होतो, असे चित्र आपण सर्यर पाहतो. अशा अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांनी, संपादकांनी प्रामाणिकपणे, पारदर्शक काम केले असेल का, असा प्रश्न उपस्थित होतो, असेही कुबेर म्हणाले.

भ्रष्टाचार केवळ आर्थिक नव्हे तर नैतिकही असतो, असे सांगताना प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांच्यासारखीच अवस्था माध्यमांतील मंडळींचीही झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी भूमिका कुबेर यांनी मांडली. समाज सर्व सरकारी आदेश खाली मान घालून ऐकतो, हा प्रश्न आहे. आपल्याकडे प्रशासन, माध्यमे आणि राजकारण्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही, ही समाजव्यवस्थेचा हास झाल्याची चिन्हे आहेत, असेही कुबेर म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख फरिदा लांबे यांनी केले. सुचित्रा काळे यांनी व्याख्यानामागील उद्देश स्पष्ट केला उपस्थितांचे आभार एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षा बालापोरिया यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराय चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी केले.