अलका धुपकर
यशस्विनी पत्रकारिता सन्मान
पुणे
२०२५
सिंधुदुर्गच्या पिंगुळी गावात जन्मलेल्या अलका यांनी कुडाळ, पानवळ आणि वेंगुर्ला येथे शिक्षण पूर्ण केले. राज्यशास्त्रात बी.ए., पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचा डिप्लोमा आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्या सध्या एम.जी. एम काॅलेज, छत्रपती संभाजी नगर येथे पीएचडी करत आहेत. “विचारवंतांच्या हत्या आणि त्याचा भारतीय लोकशाहीवरील परिणाम” याविषयावर पी.ए.डी. संशोधन करत आहे.
दोन दशकाहून अधिक काळ पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या अलका धुपकर सध्या टाईम्स ऑफ इंडियाच्या डिजिटल TOI Plus साठी सिनिअर असिस्टंट एडिटर म्हणून काम करतात. याआधी त्यांनी दैनिक महानगर, बेळगाव तरुण भारत, मुंबई सकाळ, मिड-डे, मुंबई मिरर आणि आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीसाठी काम केले आहे.
अलका यांनी राजकीय भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, वातावरण बदल, महिला हक्क, जातीआधारित अत्याचार आणि स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या विषयांवर सखोल वार्तांकन केले. २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांनी गोव्यातील सनातन संस्थेच्या मुख्यालयात जाऊन रिपोर्टिंग केले. २०१८ शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमधील त्यांचे फोटो आणि “अनवाणी पायांची सरकारला भीती का वाटते?” हा प्रश्न फोटोंच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला.
ग्रामीण भारताशी जोडलेल्या अलका यांनी शहरीकरणातील गरिबांच्या समस्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच पत्रकारितेतून मांडले. २०२२ मध्ये त्यांनी त्यांच्या पाच मैत्रिणींसोबत ‘कसोटी विवेकाची’ हे कला प्रदर्शन आयोजित करून विचारवंतांच्या हत्यांचा मुद्दा तरुणांपर्यंत पोहोचवला.
रामनाथ गोएंका एक्सलन्सी इन जर्नलिझम, UNFPA लाडली, हमसफर ट्रस्टचा लिखो अवॉर्ड, बाळशास्री जांभेकर दर्पण, सावित्रीबाई फुले यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. २०१५ मध्ये त्यांची सिंगापूरच्या एशिया जर्नलिझम फेलोशिपसाठी निवड झाली होती. अलका धुपकर यांचे पत्रकारितेतील योगदान नव्या माध्यमकर्मींना प्रेरणादायी आहे!
अलका धुपकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.