कलावती सवंडकर

यशस्विनी कृषी सन्मान
हिंगोली
2024

घरच्यांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून कलावती ताईंचे शिक्षण खूप लवकर थांबल. फक्त सातवी पर्यंतचं शिक्षण ! वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचं लग्न झालं. दोन मुली, एक मुलगा असा त्यांचा परिवार. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी नवऱ्याने सावकाराकडून कर्ज घेतले. त्यानंतर लहान मुलीच्या आजारासाठी कर्ज काढले, शेतीच्या खर्चासाठी कर्ज काढले. हा कर्जाचा आणि व्याजाचा डोंगर वाढतच गेला. आणि त्यांच्या नवऱ्याने आत्महत्या केली. घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी कलावती ताईंच्या वर आली. त्यांच्या नवऱ्याची ‘शेतकरी आत्महत्या’ होती हे सरकार मान्य करत नव्हते. त्यांच्या नवऱ्याने केलेली आत्महत्या ही शेतकरी आत्महत्या होती, हे सरकारी दरबारी पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक चपला झिजवल्या. शेवटी ‘मकाम’ या संस्थेमुळे त्यांचा तो प्रश्न मार्गी लागला. स्वत:चा प्रश्न सोडवत असताना त्यांना इतर विधवा महिलांचे प्रश्न प्रकर्षाने कळू लागले. कालांतराने अनेक विधवा महिलांचे प्रश्न त्या पुढाकार घेऊन सोडवू लागल्या. त्यांचे नेतृत्व सगळ्यांना आवडू लागले होते.

या सर्व महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या, असे त्यांना वाटत होते. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी महिला अधिक होत्या. कलावती ताईंच्या पुढाकाराने एका महिला बचत गटाची सुरुवात झाली. या बचत गटाचे वेगळेपण असे की यामध्ये सगळ्या शेतकरी विधवा महिला आहेत. या महिला एकमेकींच्या शेतात आळीपाळीने काम करतात.

मकाम तर्फे महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये पर्यावरणस्नेही शेतीचा प्रयोग चालू आहे. त्यामध्ये कलावती ताईंचा हिंगोली जिल्हा देखील येतो. २०२१ पासून कलावती ताई या प्रयोगात सहभागी झाल्या आहेत. फक्त एकट्याच त्या सहभागी न होता बचत गटातील महिलांना देखील सामावून घेतले आहे.

शेती आणि माती यांची सेवा करणाऱ्या कलावती यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी कृषी सन्मान २०२४’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media