कमल कुंभार

यशस्विनी उद्योजिका सन्मान
पुणे
2024

कमल कुंभार या धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात ७० रुपये मजुरीवर काम करायच्या. १९९९ मध्ये त्यांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून एक नवी सुरुवात केली. त्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेतीसह दहा विविध व्यवसाय सुरू केले. यातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारला आणि इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल २१ लाख रुपये असून, त्यातून त्या उत्तम कमाई करत आहेत.

कमल यांनी बांगडी विक्री, स्टेशनरी, साडी व्यवसाय, मेस, लाईट बिल वाटप, सोलार डी-लाइट असे विविध व्यवसाय केले. बचत गटांचे मेळावे, प्रशिक्षण आणि दौरे यातून त्यांनी स्वतःसह इतर महिलांना सक्षम केले. त्यांनी भाड्याने शेती घेऊन एक एकरावर व्यवसायाचे मॉडेल उभे केले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे आतापर्यंत अनेक महिलांना उद्योजिका बनवण्यात त्यांनी मदत केली, आणि भविष्यात दहा हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचे त्यांचे ध्येय आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना लक्ष्मी किसान, नारीशक्ती , नीती आयोग , युएनडीपी, फिक्की आणि राष्ट्रपती पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले. कमल यांची इच्छा आहे की, देशभरातील व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास विद्यापीठ स्थापन व्हावे. त्यामुळे मुली व महिलांना उद्योग- व्यवसाय उभा करण्यासाठी प्रेरणा, प्रशिक्षण व पूरक वातावरण लाभेल.

स्वतःसह शेकडो महिलांना सशक्त करणाऱ्या कमल कुंभार यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान २०२५” देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery