मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्यावतीने डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारात एक पुरुष आणि एक महिला शिक्षक यांची निवड केली जाते. सन २०२५ चा हा पुरस्कार बुलढाणा येथील किशोर मोतीराम भागवत आणि गडचिरोली येथील विजया शरद किरमीरवार यांना जाहीर करण्यात आला आहे. किशोर भागवत हे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, हिवरखेड, ता. खामगाव (बुलढाणा) येथे कार्यरत आहेत, तर विजया किरमीरवार या लोक बिरादारी आश्रमशाळा, हेमलकसा, ता. भामरागड (गडचिरोली) येथे सेवा देत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत येत्या ४ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
किशोर भागवत हे विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे आणि रंजक व्हावे म्हणून सातत्याने प्रयोगशील राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिकण्यासाठी अॅलेक्सा, अल्फाबेट रॅक, अक्षर टोप्या, निधी बँक यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत. कोविड काळातील ऑनलाइन शिक्षणासाठी त्यांनी राज्यातील युट्यूबर शिक्षकांची ‘टीच-ट्यूबर’ नावाची चळवळ उभी केली. तंत्रज्ञानाबरोबरच त्यांनी आपल्यातील साहित्यिक कलेचा वापर शिक्षणात केला आहे. विविध नियतकालिकांमध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतून कविता आणि लेखन ते करतात. कॅनडा येथे प्रकाशित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधिक कविता संग्रहात तसेच इंग्रजी जर्नलमध्ये त्यांच्या इंग्रजी कविता प्रकाशित झाल्या आहेत. लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकास घडवण्यासाठीचे त्यांचे विशेष प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्यांच्या शैक्षणिक धडपडीची दखल मिपा या संस्थेने घेतली होती.
विजया किरमीरवार या हेमलकसा येथील आश्रमशाळेत मागील दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘३६५ दिवस सुरू असणारी शाळा’ अशी या शाळेची ख्याती आहे. त्या गणित विषयाचे अध्यापन करतात. गणिती खेळ, खरी कमाई, गणिती शब्दकोडे, गणित बाजार यांसारखे मुलांच्या आवडीचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. गणित संबोध प्रशिक्षणात त्यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केले आहे. मैदानी खेळ, बागकाम, भाजीपाला आणि शेतीकाम यातून विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. अत्यंत दुर्गम भागात असूनही शैक्षणिक जनजागृती आणि विज्ञान प्रदर्शन यांसारख्या उपक्रमात त्या सक्रिय सहभाग घेतात. विजया किरमीरवार यांच्या कामाची दखल घेऊन ‘आदिवासी प्रकल्प विभाग, भामरागड’ यांच्यावतीने त्यांना ‘इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे.
मा. भाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निवड समितीत दत्ता वारे, अरविंद शिंगाडे, तुषार म्हात्रे, आनंदा आनेमवाड, अप्पा सावंत, वैभव तुपे, जगदीश कुडे यांसारख्या कर्तबगार शिक्षकांचा समावेश आहे. या समितीने राज्यभरातील मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षण अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून पुरस्कारासाठी शिक्षकांच्या शिफारशी मागवल्या होत्या. अनेकांकडून आलेल्या शिफारशीची छाननी करून, मुलाखती घेऊन आणि प्रत्यक्ष शाळाभेटी देऊन पुरस्कारप्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे आणि शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.



