राजश्री हेमंत पाटील

यशस्विनी उद्योजकता सन्मान
नांदेड
2023

कोणताच व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो. व्यवसायाचे छोटे रोपटे कधीतरी लावावे लागते तेव्हा कुठे त्याचे काही कालांतराने वटवृक्षात रुपांतर होते. पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या राजश्री पाटील यांनी उद्योगात पाऊल टाकायचे ठरवले. एक लक्ष ठेवी या उद्देशाने दहा बाय दहा खोलीत सुरु केलेल्या महिला बचत गटाचे रुपांतर आजच्या घडीला ‘गोदावरी अर्बन’ बँकेच्या रुपात आहे.

बचत गटातील महिलांना राज्यातील नॅशनल बँकेमध्ये अपमानास्पद वागणूक, कर्ज मागायला गेल्यावर टाळाटाळ करणे ही सर्व कारणे राजश्री ताईंच्या नजरेस पडली आणि या महिला बचत गटांसाठी आपण स्वत:हून काहीतरी केले पाहिजे. या प्रेरणेतून त्यांनी सहकारी चळवळीचा अभ्यास केला आणि उभी राहिली “गोदावरी अर्बन बँक”! या बँकेच्या आजच्या घडीला महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कनार्टक व गुजरात या पाच राज्यात ९२ शाखा आहेत. राजश्री ताईंच्या प्रयत्नातून आताच गोवा राज्यात देखील परवानगी मिळाली आहे. या बँकेत ४३७ महिला कर्मचारी काम करतात तसेच या उद्योगाच्या माध्यमातून ८० हजार पेक्षा जास्त महिलांना पाठबळ मिळाले आहे.

राजश्री ताई त्यांच्या कार्यातून महिला सशक्तीकरणावर कायम भर टाकत आल्या आहेत. शहरी भागातील उच्चशिक्षित महिलांपासून ते दुर्गम भागातील आदिवासी महिलांपर्यंत ही उद्योगयात्रा पोहचविण्यासाठी राजश्री ताई संपूर्ण महाराष्ट्र्भर फिरत असतात तसेच विविध माध्यमातून या अंधारात लपलेल्या हिरकणींना प्रकाशझोतात आणण्याचे काम देखील त्या करत आहेत.

आदरणीय शरद पवार साहेबांनी आणलेल्या महिला धोरणाचा प्रत्यय राजश्री हेमंत पाटील यांच्या कार्यात पाहायला मिळत आहे. उद्योजिका राजश्री हेमंत पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media