लक्ष्मी नारायणन

यशस्विनी सामाजिक सन्मान
पुणे
2023

शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्रातील महत्वाचे केंद्र म्हणजे पुणे…! अशा या शहरात लोकांची गर्दी वाढत असताना एका बाजूला त्या शहराचे पर्यावरण देखील लक्षात घेतले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. त्यापैकी ‘कचरा वेचक’ हा एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यांचे पर्यावरणातील योगदान, कामगार म्हणून त्यांचा दर्जा, शहराच्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका हे देखील महत्वाचे आहे. हीच उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून १९९३ साली पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कचरा वेचकांनी एकत्र येऊन कागद काच पत्र कष्टकरी पंचायत ही संघटना स्थापन केली. या संस्थेच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणजे “लक्ष्मी नारायणन”! जवळपास १९८९ पासून त्या कचरा वेचणाऱ्यांसोबत काम करत आहेत.

आजच्या घडीला या संस्थेचे नऊ हजार पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य हे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आणि वंचित वर्गातल्या महिला आहेत. प्रत्येक सदस्य संस्थेला वार्षिक शुल्क आणि त्यांच्या जीवन विमा संरक्षणासाठी समान रक्कम देतो. या संस्थेच्या सदस्यांना पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त आय कार्ड दिले जातात आणि ते त्यांच्या कुटुंबासाठी, उदरनिर्वाहासाठी व्याजमुक्त कर्ज घेऊ शकतात तसेच त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी बाकीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आजच्या घडीला पुण्यात हिरवे स्वच्छ कोट आणि केशरी पुशकार्ट्स सगळीकडे आहेत कारण ३७०० कचरा वेचक दहा लाख झोपडपट्टीतील रहिवाशांसह पुण्यातील चाळीस लाख नागरिकांना सेवा देत आहेत. अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे ही संस्था पुण्यातील कचरा वेचक समुदायातील बालमजुरी दूर करण्यात, मुलांच्या शिक्षणाला मदत, क्रेडिट, परवडणारी वैद्यकीय सेवा आणि विमा सुलभ करण्यात सक्षम आहे.

कचरा वेचकांचे प्रश्न कायमचे सुटावेत आणि लक्ष्मी नारायणन यांच्या या कार्याची भरभराट व्हावी, या सदिच्छा. लक्ष्मी नारायणन यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी सामाजिक सन्मान २०२३’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media