गोदावरी डांगे

यशस्विनी कृषी सन्मान
उस्मानाबाद
2022

आपण तुळजापूर येथील रहिवासी. कमी वयात आपल लग्न झालं. लग्नानंतर अल्पावधीतच पतीचं निधन झालं. पदरी लहान मुल आणि समोर अडचणींचा डोंगर, परंतु अशा परिस्थितीत आपण खचून न जाता वेगवेगळ्या महिला बचत गटांशी जोडून महिलांना एकत्र केलं. आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि रोजीरोटीशी संबंधित विषयांवर काम करण्यासाठी आपण 'वुमन्स फेडरेशन' वा संस्थेची पायाभरणी केली. आपण सुरू केलेल्या 'वुमन्स फेडरेशन' संस्थेचे आजघडीला तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत. न्यूयॉर्क येथे २०११ साली भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महिलांविषयक परिषदेमध्ये सर्वसामान्य भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आपल्याला मिळाली. ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट! याशिवाय संयुक्त राष्ट्रांनी २०१५ साली जपान येथे भरवलेल्या आपत्ती व्यवस्थापन विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेत देखील आपण सहभागी झालात.

'स्वयंशिक्षण प्रयोग' या संस्थेच्या माध्यमातून आपण कृषी क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून अखंडपणे काम करीत आहात. हवामानाशी सुसंगत शेती या विषयाच्या आपण तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाता. आपण करत असलेल्या कार्यासाठी आपल्याला यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला वहिला 'यशस्विनी कृषी सन्मान' पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महिलांच्या साथीने शाश्वत विकासासाठीचे हे आपले कार्य अविरत सुरु रहावे, याच सदिच्छा. आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.

Yashwantrao Chavan Digital Media