जगदीश कन्नम

युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2023

सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध मराठवाड्यात जन्माला आलेल्या जगदीश कन्नम यांची मूळ भाषा तेलुगु परंतु मराठीला मी मातृभाषा मानतो, असे ते ठणकावून सांगतात. दोन्ही संस्कृतींचा वारसा त्यांचा पाठीशी आहे.

वयाच्या दुसऱ्या वर्षापासून जगदीश यांचा संगीतातील प्रवास सुरु झाला. ताल वाद्यावरील प्रेम पाहून आई वडिलांनी त्यांना तबला भेट दिला. वयाच्या १० व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जगदीश आणि त्यांच्या आईने "जय लक्ष्मी इडली वडा सेंटर" चालू केले. एका सशक्त एकल मातेने त्यांचा सांभाळ केला. ‘आईच्या पाठिंब्यामुळे माझी भरभराट झाली आणि आयुष्यात एक उंची गाठता आली” असे ते ठामपणे सांगतात.

महाविद्यालयीन काळात प्रा.गजानन केचे, प्रा.डॉ.किशोर शिरसाठ, नितीन गरुड आणि प्रा. बाळू बटुले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तीन वर्षांच्या महाविद्यालयीन काळात अनेक युवा महोत्सवांमध्ये त्यांनी भाग घेतला. जिथे महाराष्ट्राच्या लोककला, परंपरा आणि संस्कृतीचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.

लोककला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठात पीजी डिप्लोमाचा कोर्स देखील केला. प्रा. कृष्णा मुसळे, प्रा. विजय चव्हाण, हेमाली शेडगे, मदन दुबे, प्रा. योगेश चिटगावकर, मोनिका ठक्कर, प्रा. शिवाजी वाघमारे आणि डॉ. प्रा. गणेश चंदनशिवे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

हे सर्व अभिनयाचे शिक्षण घेत असताना त्यांनी बी.ई. रोजगार या वेब सेरीज मध्ये आणि जून या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या नावाजलेल्या शो मध्ये देखील त्यांनी भारुडाचे सादरीकरण केले आहे.

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा आणि दौंड येथील अभिरंग नाट्यमहोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्यास हातभार लावणाऱ्या जगदीश कन्नम यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !

जगदीश कन्नम यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार” देताना अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media