डॉ. अभय बंग - डॉ. राणी बंग

राष्ट्रीय पुरस्कार
2024

डॉ.अभय बंग यांचं बालपण वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षणही महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या नई तालीम शिक्षण पद्धतीच्या शाळेत झालं. त्यामुळे त्यांच्या विचारांवर महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाचा मोठा पगडा आहे. तर डॉ.राणी बंग यांचा जन्म चंद्रपूर इथं दक्षिण भारतीय कुटुंबात झाला. या दोघांचंही एमबीबीएस आणि एमडीपर्यंतचं शिक्षण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झालं. या दोघांनीही विद्यापीठीय पातळीवर आणि अखिल भारतीय स्तरावर प्रथम स्थान मिळवत अनेक सुवर्णपदकं मिळवली. नंतर अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थचं शिक्षण पूर्ण केलं. तिथं कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले.

पुढे १९८४ मध्ये ते भारतात परतले तेव्हा आरोग्याच्या सर्वाधिक समस्या या खेड्यांमध्ये आहेत, याची बंग दाम्पत्याला कल्पना होती. त्यामुळे त्यांनी खेड्यांमध्ये काम करण्याचा निर्धार केला. त्याच निर्धारातून सन १९८६ साली 'सर्च' अर्थात सोसायटी फॉर एज्युकेशन, अ‍ॅक्शन अँण्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ या सेवाभावी संस्थेचा जन्म झाला आणि त्या संस्थेने आदिवासी बांधवांच्या आयुष्याला नवसंजीवनी दिली. गडचिरोलीपासून १७ किलोमीटर अंतरावर ‘शोधग्राम’ आकारास आलं. आदिवासींच्या लोकभावनेचा आदर करत त्यांच्याच आग्रहावरून रुग्णालयाचं ‘माँ दंतेश्वरी दवाखाना’ असं नामकरण करण्यात आलं आणि तेथून त्यांच्या वैद्यकीय सेवेचा प्रारंभ झाला.

आरोग्याच्या प्रश्नांवर काम करताना स्थानिक महिलांना सामान्य आजारासोबतच स्त्रीरोगाच्या मोठ्या समस्या असल्याचे डॉ.राणी बंग यांना जाणवले. त्यामुळे बंग दाम्पत्याने 'वसा' आणि 'अमिर्झा' या दोन गावात संशोधन केलं. त्यात आढळलं की, ९२ टक्के महिलांना स्त्रीरोगाची समस्या आहे. हेच संशोधन १९८९ साली ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. विकसनशील देशांतील स्त्रियांच्या आरोग्याविषयीचं हे या दशकातील महत्वाचं संशोधन आहे, अशा शब्दात अमेरिकेतील तज्ज्ञांनी त्याचा गौरव केला. स्त्री आरोग्याच्या समस्यांना या संशोधनामुळे पुरावा मिळाला. त्यामुळेच १९९४ साली कैरोमध्ये जागतिक लोकसंख्या नीती बदलून ‘महिलांचे प्रजोत्पादनातील आरोग्य’ यावर भर देणारी नवी नीती तयार करण्यात आली. पुढे बंग दाम्पत्याने बालमृत्युवरही काम सुरू केलं. विशेष म्हणजे ते काम आजही सुरूच आहे. सुरुवातीला अर्भक मृत्युदर १२१ वर होता. त्यातील ४० टक्के बालकांचे मृत्यू हे केवळ न्यूमोनिया या आजारानं होतात, असं त्यांना आढळलं. ही बालकं शहरापर्यंत उपचारासाठी येऊ शकत नव्हती. त्यामुळे गावातच एक आरोग्यदूत तयार करायचा आणि त्याला न्युमोनियाचं निदान करायला शिकवायचं हा प्रयोग करण्यात आला. गावातील एका व्यक्तीला आरोग्यदूत म्हणून प्रशिक्षित करून उपचार करायला शिकवल्याने १९८८ ते ९० या दोन वर्षांत न्युमोनियामुळे होणारे मृत्यू ७४ टक्क्याने, तर अर्भक मृत्युदर २५ टक्क्यांनी कमी झाला. हे अध्ययनही ‘लॅन्सेट’मध्ये १९९० मध्ये प्रसिद्ध झाले. जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने हे या विषयावरचं सर्वोत्कृष्ट अध्ययन असल्याचं घोषित केले. तसेच १९९१ मध्ये वॉशिंग्टनमध्ये श्वसन रोग आणि न्युमोमिया नियंत्रणाविषयी भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्चनं राबवलेला उपक्रम पथदर्शी ठरवला गेला. आजही भारतासह ७७ देशात ही पद्धत वापरली जाते. सामुदायिक आरोग्याचे प्रश्न सोडवतानाच डॉ.बंग दाम्पत्याने १९८८ पासून व्यसन मुक्ती चळवळ उभारली. याच प्रयत्नातून १९९३ साली गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी आणि सोबतच तंबाखुमुक्ती साध्य करण्यासाठी ‘सर्च’द्वारे आखलेला ‘मुक्तिपथ’ हा उपक्रम फारच पथदर्शक ठरला.

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातल्या विविध अनुभवांवर डॉ.अभय बंग यांची 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' आणि 'सेवाग्राम ते शोधग्राम' तर डॉ.राणी बंग यांची 'गोईण', 'कानोसा' आणि 'पुटिंग विमेन फर्स्ट' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कुपोषणामुळे होणार्‍या बालमृत्यूचे वास्तव किती प्रखर, भीषण आहे, हे पटवून देण्यासाठी त्यांनी ‘कोवळी पानगळ’ हा अहवाल प्रसिध्द केला. त्यांची बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने सुध्दा दखल घेतली. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू प्रतिबंध आणि स्त्री आरोग्याच्या समस्यांबाबत त्यांनी तयार केलेला उपक्रम आज भारतासह अनेक देशांत राबवला जात आहे.

डॉ.बंग दाम्पत्याला आजपर्यंत विविध नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण, अमेरिकेच्या टाईम मॅगझिनचा ‘ग्लोबल हेल्थ हिरोज’, जागतिक आरोग्य संघटनेचा ‘पब्लिक हेल्थ चॅम्पियन्स’, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचा ‘सोसायटी ऑफ स्कॉलर’, मॅकऑर्थर फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचा ‘बा आणि बापू’ पुरस्कार तसेच मानद डी.एससी व डी.लिट या पदव्यांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे डॉ.अभय बंग हे भारत सरकारच्या 'आदिवासींचे आरोग्य' यावरील तज्ञ समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या संतुलित विकास अर्थात डॉ.केळकर समितीचे सदस्य, बालमृत्यू व कुपोषण विषयक समितीचे अध्यक्ष व अमेरिकेतील राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वैद्यकीय समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर डॉ.राणी बंग राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि राष्ट्रीय पोषण आयोगाच्या सदस्या यासह अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांवर तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत.

डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांनी सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात भरीव योगदान देऊन आदिवासी बांधवांच्या आयुष्यात आनंद "निर्माण" केला त्याबद्दल डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून प्रोत्साहन देऊन त्यांच्या चार दशकीय प्रवासाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२४' देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

Video Gallery

Yashwantrao Chavan Digital Media