पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन २०२४ वर्षासाठी हे पारितोषिक कृषि औद्योगिक समाज रचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान- तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृती या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येणार आहे.

रोख रक्कम २ लाख रुपये, शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून त्यासाठी सुयोग्य संस्था व व्यक्तींची नावे विहित नमुन्यात सुचविण्यासाठी व पारितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईट, मुंबई ४०००२१ या पत्यावर किंवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेलवर अपलोड करावीत. पारितोषिकाचे निकष सेंटरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पारितोषकासाठी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, सुसंस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यासाठीच चव्हाण सेंटरच्या वतीने त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया, लोकहितवादी मंडळ, प्रा. एन्. डी. पाटील आदी मान्यवर तसेच संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.