यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक दिले जाते. पारितोषिक महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येते. सन २०२४ वर्षासाठी हे पारितोषिक कृषि औद्योगिक समाज रचना व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान- तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, मराठी साहित्य व संस्कृति या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणा-या व्यक्ती किंवा संस्थेस देण्यात येणार आहे. रोख रक्कम २ लाख रुपये, शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे.
या पारितोषिकासाठी सुयोग्य संस्था व व्यक्तींची नावे विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी व पोरितोषिक नियमावलीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईट, मुंबई ४०००२१ या पत्यावर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध गुगल फॉर्म वर अपलोड करावीत. पारितोषिकाचे निकष सेंटरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पारितोषिकासाठी नावे पाठविण्याचे अखेरची तारीख ३० सप्टेंबर २०२४ अशी आहे.
यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, सुसंस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे.