राज्य आल्यावर त्याचा वापर कसा करायचा ही भूमिका मांडण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक व्याख्यानातून केले. पंचायत राज्याची यंत्रणा आणली. इतकेच नाही तर सामाजिक, शेती, शिक्षण, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी त्यांनी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक शहरे उद्योगाच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याच्या मागे यशवंतराव चव्हाण साहेबांची दूरदृष्टी महत्त्वाची होती असे उद्गार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान महत्त्वाचे आहेच शिवाय हे राज्य मराठी भाषिकांचे होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण यात महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले असेही ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.
यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलो आहोत. दरवर्षी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या दिवशी आपण करतो. मला आनंद आहे की, यावेळेला ज्यांना नोबल पुरस्कार प्राप्त झाला त्यातून भारताचे नावलौकिक वाढवण्याची कामगिरी केली अशा डॉ. अभिजित बॅनर्जी यांचा आपण सन्मान करतो आहोत असेही श्री. पवार यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण साहेब हे देशातील विविध विषयात योगदान दिलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही, सांपत्तिक पार्श्वभूमी अजिबात नाही. पण मातेचे संस्कार ज्यांच्यावर झाले त्याचे ऋण सदैव मानणारे, मातृ पितृ बद्दलाची प्रचंड आस्था असणारे असे यशवंतराव चव्हाण साहेबांचे व्यक्तिमत्व होते, अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांच्या विविध पैलूंवर भाष्य केले. शैक्षणिक क्षेत्रात कायदेपंडित झाले. पण त्याचा उपयोग कधीच त्यांनी खटले लढवण्यासाठी केलेला नाही. यातून उभं आयुष्य सामान्य माणसांच्या प्रश्नांची वकिली करण्याचे काम केले. शेतीही महत्त्वाची आहे. त्यात बदल करण्याचा विचार त्यांनी मांडला. यात अनेक संधी उभारण्याचे काम केलं. त्यासाठी कृषी औद्योगिक समाजाची निर्मिती करण्याचा विचार त्यांनी दिला. त्यासोबतच त्यांच्याभोवती अनेक विचारवंतांचा वर्ग असायचा. त्यातून सुसंस्कृत समाज उभारण्याचे काम त्यांनी केले होते.
चीनसारखं संकट देशात आल्यावर नाउमेद झालेली जनता पाहून देशात पुन्हा एकदा मनोधैर्य वाढवण्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण साहेबांनी घेतली आणि राज्यातील सत्ता सोडून केंद्रात जाण्याची भूमिका घेतली. इतकेच नाही तर त्याहून अनेक विभागात आपल्या मोलाच्या कामगिरीचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांची प्रेरणा घेऊन आपण आपली पुढील वाटचाल करू असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जयंत लेले यांच्या ‘यशवंतराव चव्हाण यांचे प्रकट चिंतन – भारत: समाज आणि राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस शरद काळे, डॉ. अनिल काकोडकर, अरुण गुजराथी, जयंत लेले, प्रदीप चंपानेरकर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे कोषाध्यक्ष हेमंत टकले उपस्थित होते.