मुंबई, ता. २५: खेड्यापाड्यातल्या लोकांना त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याच्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं करण्याच्यासाठी 'युसुफ मेहेरअली' संस्थेने आणि सगळ्या सहकाऱ्यांनी अविरत कष्ट केले आणि ही संस्था एका उत्तम पातळीवर आणून पोहोचवली. ज्या ज्या वेळेला देशामध्ये संकट आलं, अडचणी आल्या त्या वेळेला 'युसुफ मेहेरअली सेंटर' तिथे धावून गेलं आणि आपली जबाबदारी ही त्यांनी लोकांना दाखवली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिले जाणारे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२५’ ‘युसूफ मेहेरअली सेंटर, तारा’ यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, मला अतिशय आनंद आहे की, या वेळेला डॉ. काकोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने निवड केलेली संस्था 'युसुफ मेहेरअली' एक अतिशय उत्तम सेवाभावी वृत्तीची ही संस्था आहे आणि त्याची निवड त्यांनी केली.माझा आणि जी. जी. पारखांचा घनिष्ठ संबंध होता, ते हल्लीच गेले. पण अगदी गेल्या वर्षीपर्यंत दर महिन्याला काही ना काही प्रश्नांच्या निमित्ताने दोन-तीन वेळेला ते माझ्याकडे येत असत, काही प्रश्न मांडत असत. इतकं वय झाल्याच्यानंतरसुद्धा कष्ट करायला ते कधी मागे पुढे राहिलेले नाही. अखंड प्रयत्न करत राहिले आणि 'युसुफ मेहेरअली' या संस्थेच्या संबंधी त्यांना प्रचंड आस्था होती. युसुफ मेहेरअली स्वतःच थोर नेते होते, मुंबईचे महापौर होते. दुर्दैवाने त्यांना आयुष्य जास्त मिळालं नाही. पण जे काही मिळालं ते समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी ते आयुष्य घालवलं. ते गेल्याच्यानंतर जी. जी. पारीख असोत, मधु दंडवते असोत, अनेक डाव्या चळवळीचे नेते असोत. या सगळ्यांचा सहभाग युसुफ मेहेरअली यांच्या संस्थेशी गेली अनेक वर्ष होता.
कार्यक्रमात चव्हाण सेंटरच्या भविष्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जागर उभा केला होता. ही संस्था महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची आहे. सध्या शिक्षणात एआयचा प्रभाव वाढतो आहे. पुढील पाच-दहा वर्षांची वाटचाल कशी असेल, याचे चिंतन आम्ही करत आहोत. सेंटरच्या ग्रंथालयाची सदस्यता वाढली आहे, ही आश्वासक बाब आहे. महिला सबलीकरणासाठी नियोजन करत आहोत. तंत्रज्ञान बदलत असले तरी अंधश्रद्धा आणि हुंडाबळी वाढत आहेत. याविरोधात काम करण्याची गरज आहे.
यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर, भालचंद्र मुणगेकर, मधू मोहिते, नितीन आणेराव, कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यावेळी डॉ.अनिल काकोडकर यांनी केली. प्रोफेसर अनिल गुप्ता यांना १२ मार्च २०२६ रोजी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.



