उद्या रविवारी मुंबई येथे अंतिम संस्कार
मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त तथा आदरणीय शरद पवार साहेबांचे सहकारी, शरद काळे सर यांचे काल (दि. ३१) रात्री निधन झाले. खासदार आणि चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी रात्री उशिरा ही माहिती दिली.
काळे सर यांच्या पार्थिवावर उद्या (रविवार दि. २) मुंबई येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. काळे सरांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून अतिशय भरीव आणि मोलाचे काम केले आहे. इतकेच नाही तर चव्हाण सेंटरच्या जडणघडणीत त्यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. अतिशय कुशल प्रशासक अशी त्यांची ख्याती होती. प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रशासनिक जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या.
शरद काळे सर यांचे बालपण आणि शालेय शिक्षण पुणे येथे झाले. गणित विषयात त्यांनी १९६२ मध्ये पुणे येथून सुवर्ण पदक मिळविले होते. प्रशासकीय सेवेत ते १९६३ मध्ये दाखल झाले. यानंतर १९७२ साली हवाई विद्यापिठातून काळे सरांनी एमबीए ची पदवी प्राप्त केली. राज्य व भारत सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या समित्यांवरही त्यांनी काम पाहिलेले आहे. निवृत्तीनंतर सरांनी १९९८ पासून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कामकाजाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण सेंटरने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडले.
शरद काळे सरांचे निधन ही आम्हा सर्वांची वैयक्तिक हानी आहे. ती कधीही भरुन येणार नाही. त्यांची उणीव आम्हा सर्वांना कायम जाणवत राहिल, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण काळे कुटुंबियांच्या सोबत आहोत. सरांच्या पार्थिवावर उद्या (रविवार दि. २) मुंबई येथे अंतीम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.शरद काळे सर - अल्प परिचय
श्री. शरद गं. काळे सरांची शैक्षणिक तसेच महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या प्रशासकीय सेवेतील देदीप्यमान कारकीर्द
जन्म : १७ ऑक्टोबर १९३९ पुणे
१९५६ मॅट्रीक परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम
१९६० कला शाखेत पदवीधर महाराष्ट्रात प्रथम
१९६२ गणित परिक्षेमध्ये सुवर्ण पदक
१९६२ हॉर्वर्ड युनिर्व्हसिटीमधून उपकुलगुरूचे सुवर्ण पदक
१९६३ मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल
१९६९-७० मुख्यमंत्र्याचे सचिव, गोवा राज्य
१९७४-७७ विशेष सहाय्यक, केंद्रीय वित्त मंत्री / परराष्ट्र मंत्री (मा. यशवंतराव चव्हाण)
१९८३-८५ मुख्यमंत्र्याचे सचिव (मा. वसंतदादा पाटील)
१९८५-८६ मुख्यमंत्र्याचे सचिव (मा. शिवाजीराव निलंगेकर)
१९८९-९० शिष्यवृत्ती, हॉर्वर्ड युनिर्व्हसिटी, केंम्ब्रीज, यु. एस. ए.
आयुक्त, मुंबई महानगरपालिका
१९९६-९७ अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट ० १९९८ पासून सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
२०१२-१९ अध्यक्ष, दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई