नव्या जगाची आव्हाने युवाच स्वीकारू शकतात - विवेक सावंत
मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) - नव तंत्रज्ञान आणि सोशल माध्यमांमुळे जगभरातला मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा प्रसंगी कला, साहित्य, उद्योग जे काही द्यायचे आहे ते जागतिक पातळीवर द्यावे लागणार आहे; आणि हे आव्हान केवळ युवाच स्वीकारू शकतात, अशा शब्दात एमकेसीएल चे चीफ मेंटॉर व ज्येष्ठ माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ विवेक सावंत यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१’ चे विवेक सावंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे,लेखिका व कवयित्री प्रज्ञा दया पवार, दीपाली चांडक, मुमताज शेख, मनोज हाडवळे, अजित भुरे, संजय घारपुरे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना विवेक सावंत यांनी नवमहाराष्ट्र हा जगाला काय देऊ शकतो. याचा विचार करण्याची गरज आहे; आणि तो विचार केवळ युवाच करू शकतात. कारण आव्हान स्वीकारण्याची आणि त्यावर उत्तर शोधण्याची उर्मी त्यांच्याकडेच असते,प्रौढांकडे नाही.असे प्रतिपादन केले..
चव्हाण सेंटरच्या माध्यमातून युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार व साहित्य क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना यबेली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा रंगला. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजारांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी सर्व पुरस्कारार्थी युवांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यंदाचे युवा क्रीडा पुरस्कार आंतरराष्ट्रीय क्रीडापटू राही सरनोबत (नेमबाज, कोल्हापूर), स्वरूप उन्हाळकर (पॅरालॉंपिक, कोल्हापूर), अविनाश साबळे (धावपटू, बीड) यांना प्रदान करण्यात आले. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडापटू अंजली भागवत, क्रीडा पत्रकार शैलेश नागवेकर, संजय घारपुरे, विजय साळवी व शंतनू सुगवेकर यांचा समावेश होता.
सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छाया भोसले (श्रीगोंदा,अहमदनगर) व रवी चौधरी (औरंगाबाद) यांना सामाजिक युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार निवड समितीमध्ये अनिकेत आमटे, प्रा.हमीद दाभोळकर, दीपक नागरगोजे, मुमताज शेख व दीप्ती राऊत यांचा समावेश होता.
महाराष्ट्राला कला-साहित्याची मोठी परंपरा आहे. अनेक कलांचे उगमस्थान असलेल्या या भूमीतील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) सादर करणाऱ्या युवक-युवतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात नाट्य विभागात अक्षय शिंपी (मुंबई), शास्त्रीय नृत्य विभागात स्वरदा भावे (पुणे), लोककला विभागात शुभम अवधूत, पोवाडा (सांगली), तर शास्त्रीय संगीत विभागात यशवंत वैष्णव, तबलावादक (मुंबई) या चौघांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराच्या निवड समितीत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे, प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनिस, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे व प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा समावेश होता.
मराठी भाषेत मागील पाच वर्षांत साहित्यकृतींचे लिखाण करणाऱ्या युवक व युवतींना साहित्य युवा पुरस्कार २०२१ देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये सोलापूरच्या ऐश्वर्या रेवाडकर (पुस्तक : बिजापूर डायरी) व बार्शी येथील ज्ञानेश्वर जाधवर (पुस्तक : येसन) यांना सन्मानित करण्यात आले. या निवड समितीत प्रा. प्रज्ञा दया पवार, सोनाली नवांगुळ, प्रा.ऐश्वर्य पाटेकर, डॉ.कैलास अंभूरे व बालाजी मदन इंगळे यांचा समावेश होता.
आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मिनाक्षी वाळके (चंद्रपूर), अश्विन पावडे (औरंगाबाद/अकोला) व सोनाली गराडे (नाशिक) या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात आले. या निवड समितीमध्ये आनंद अवधानी, सुनील किर्दक, दीपाली चांडक व मनोज हाडवळे यांचा समावेश होता.या सर्व पुरस्कारासाठी अर्ज स्वीकृती व अंतिम निवड प्रक्रियेपर्यंतचे सर्व कामकाज नवमहाराष्ट्र युवा अभियानचे संघटक निलेश राऊत व संतोष मेकाले यांनी यशस्वीपणे पार पाडले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ,विजय कान्हेकर,नवमहाराष्ट्र युवा अभियानचे नीलेश राऊत,संतोष मेकाले,दीपिका शेरखाने यांच्यासह सुबोध जाधव, डॉ. अमित नागरे, मनीषा खिल्लारे,सुकेशीनी मर्चंडे, शिवाजी गावंडे,डॉ. रणजित बायस,भूषण काळे ,डॉ. विनायक गव्हाणे, वेदांशु पाटील , वैभव गांगुर्डे, सूरज भोईर, अभिजित देशमुख,रवी झेंडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कोळी व ऐश्वर्या भद्रे यांनी केले तर डॉ.अमित नागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.