केवळ पोस्टल खर्चात पुस्तक मागवणे झाले आता आणखी सोपे
पुणे, दि. ३१ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पुस्तकदूत योजनेला राज्यभरातील वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता ही योजना आणखी सोपी, सुटसुटीत करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. खासदार सुळे यांच्या हस्ते या वेबसाईटचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
बारामती लोकसभा मतदार संघासह राज्यभर वेगवेगळ्या गाव आणि शहरांना दौऱ्यानिमित्त भेट देणाऱ्या खासदार सुळे यांनी भेटवस्तूऐवजी पुस्तके भेट द्या, असे आवाहन केले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असून त्यांच्यासह खासदार शरद पवार यांच्याकडे भेटीदाखल अनेक दर्जेदार पुस्तके जमा होत आहेत. याबद्दल पुस्तक देणाऱ्यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. ही पुस्तके इच्छुक वाचकांना देण्यात येत असून या संपूर्ण प्रक्रियेसाठी https://pustakdoot.chavancentre.org ही स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून पुस्तके मागविणे आणखी सोपे होणार आहे.
राज्यभरात दौऱ्याच्या निमित्ताने फिरत असताना अनेक सहकारी, मित्र व कार्यकर्ते खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटायला येतात. येताना प्रेमापोटी काही ना काही भेटवस्तू, हार, पुष्पगुच्छ, एखादी फोटो-फ्रेम आवर्जून आणतात. यात काही पुस्तकांचाही समावेश असतो. अशा प्रकारे भेटीदाखल आलेल्या शेकडो पुस्तकांचा गेल्या काही वर्षांत चव्हाण सेंटरकडे मोठा साठा तयार झाला आहे. सेंटरच्या ग्रंथालयात असणारी ही पुस्तके वाचकांसाठी वैचारिक खजिनाच निर्माण झाला आहे. हा खजिना सेंटरला भेट देणाऱ्यांबरोबरच राज्यातील अन्य वाचकांच्या हातीही देता येऊ शकतो हे लक्षात घेऊन खासदार सुळे यांच्या संकल्पनेतून पुस्तकदूत योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून अगदी नाममात्र म्हणजे केवळ पोस्टेज खर्चात वाचकांच्या घरी पाठवण्यात येत आहेत.
भेटीदाखल आलेल्या पुस्तकांचा जसा ओघ सुरू आहे. त्याचप्रमाणे पुस्तकदूत योजना सुरू होताच राज्यभरातून वाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. फेसबुक आणि अन्य समाज माध्यमांतून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या यादीला भरभरून मिळत असलेला प्रतिसाद पाहता चव्हाण सेंटरच्या वतीने स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना आता आणखी सोपी, सुटसुटीत आणि वाचकांसाठी सहज हाताळण्यायोग्य झाली आहे. या वेबसाईटचे लोकार्पण करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'दौऱ्यात असताना भेटीदाखल आलेले प्रत्येक पुस्तक आम्ही आधी वाचतो व नंतर आलेली सर्व पुस्तके चव्हाण सेंटरच्या राष्ट्रीय ग्रंथालयास दिली जातात. ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांमध्ये आलेले नवीन पुस्तक आधीपासून नसेल तर ते राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये ठेवून घेतले जाते. जर ते आधीपासून उपलब्ध असेल तर पुस्तके 'पुस्तकदूत' योजनेच्या माध्यमातून ती गरजू वाचकांना केवळ पोस्टेज खर्चामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी ठेवली जातात. ही योजना अधिकाधिक पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी चव्हाण सेंटरच्या माध्यमातून ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे'. प्रा. डॉ. नितीन रिंढे, लेखिका प्रज्ञा पवार, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. रणधीर शिंदे, किरण येले, गणेश विसपुते, दिलीप चव्हाण, नाट्यकर्मी विजय केंकरे, राजीव नाईक, अजित दळवी, शफाअत खान, ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, प्रमोद मुनघाटे, प्रख्यात लेखिका श्रद्धा कुंभोजकर, कवी दासू वैद्य, राजीव तांबे, दत्ता बाळसराफ, दीप्ती नाखले, सतिश पवार, रवींद्र झेंडे, अनिल पाझारे, चेतन कोळी, योगेश कुदळे, संतोष मेकाळे आदी यावेळी उपस्थित होते.
या वेबसाईटवर पुस्तकांची नावे पाहून त्याच ठिकाणी बुक करून केवळ पोस्टेज खर्चामध्ये मागवणे वाचकांना शक्य होणार आहे. या माध्यमातून लवकरात लवकर कोणत्याही अडचणींशिवाय पुस्तके पोहोचतील. पुस्तकदूत या योजनेचा लाभ घेण्यासाठी या वेबसाईटवर नोंदणी अवश्य करावी, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले आहे.