बालगंधर्वमध्ये २२ जून रोजी वितरण सोहळा
पुणे, दि. १२ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 'यशस्विनी सन्मान' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा जणींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून येत्या २२ जून रोजी पुण्यात बालगंधर्व रंग मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला धोरणाला २२ जून रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवसाचे महत्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून खासदार शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रमुख उपास्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. "आम्ही आमच्या आरोग्यासाठी" या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉ. शुभदा देशमुख (कुरखेडा, जि. गडचिरोली) यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान', विविध विषयांवर नाटक, मालिका यांसह चौफेर लिखाण करणाऱ्या मनस्विनी लता रवींद्र (पुणे) यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान', महिलांना सेंद्रिय शेतीकडे वळवून शेतीमालास योग्य तो भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोदावरी डांगे (तुळजापूर, उस्मानाबाद) यांना 'यशस्विनी कृषी सन्मान', विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवनाऱ्या जान्हवी प्रसाद पाटील (कोल्हापूर, सध्या ठाणे) यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान', उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या शीला साबळे (महाड, रायगड) यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान', कबड्डी खेळाडू व आता प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या सिमरत गायकवाड (डोंबिवली, ठाणे) यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान' जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून या सहाही क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करत योगदान देणाऱ्या या सहजणींना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण देशात प्रथमच सन १९९४ साली महिला धोरण जाहीर केले. या महिला धोरणाला यंदा २८ वर्ष पूर्ण होत आहेत. ते जाहीर करण्याची तारीख २२ जून हीच होती. ते औचित्य साधून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर या सहा 'यशस्विनी' मिळाल्या असून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत. असे त्यांनी नमूद केले.