मुंबई, ता. १०: कविवर्य ना. धों. महानोर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्याची कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार सेंटरने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या नावाने सुरू केलेल्या सहा पुरस्कारांची घोषणा केली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जळगावचे भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती पाणी या क्षेत्रांत एकूण सहा पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. दरवर्षी सहा पुरस्कारांपैकी चार पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी, तर दोन पुरस्कार शेती व पाणी या क्षेत्रांसाठी असतील. त्यानुसार सन २०२४च्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्कारासाठी राज्याच्या सर्व विभागांतून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. १९ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या शिफारशींमधून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त निवड समितीने नावे जाहीर केली आहेत. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. नितीन रिंढे, शंभू पाटील, अजित भुरे, दत्ता बाळसराफ इत्यादी मान्यवर पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी परिवर्तन जळगाव आयोजित शंभू पाटील व सहकारी यांचे सादरीकरण असलेला 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' हा अभंग गायनाचा कार्यक्रम होईल.
शेती-पाणी क्षेत्र : १. शीला खुणे (लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) या अल्पभूधारक महिलेने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून कलिंगडाचे किफायतशीर पीक घेतले आहे. २. वर्षा हाडके (आष्टी, ता. कळंब, जि. यवतमाळ) पतीच्या निधनाने खचून न जाता तरुण वयातच वर्षा हाडके निर्धाराने शेती करून सोयाबीनचे भरघोस पीक घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत.
साहित्य क्षेत्र : ३. गणेश घुले (बजाजनगर, वाळूज, औरंगाबाद) राज्यात अनेक ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलनात 'सुंदर माझी शाळा' कवितेच्या सांगीतिक प्रयोगाचे सादरीकरण करतात. ४. महेश लोंढे (बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर) नावाक्षर दर्शन, नव-अनुष्टुभ, अभिधानंतर, परिवर्तनाचा वाटसरू अशा नियतकालिकांमधून नियमित कविता लेखन करत आहेत. सध्या ते आपल्या पहिल्या कादंबरीवर काम करत आहेत. ५. नामदेव कोळी (कडगाव, ता. जि. जळगाव) 'काळोखाच्या कविता' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून सातत्याने कविता लेखन करत आहेत. त्यांना अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. ६. प्रदीप कोकरे (वडाळा, मुंबई) युगवाणी, खेळ, मुक्त शब्द, अभिधानंतर, कवितारती, लोकसत्ता, काव्याग्रह, वर्णमुद्रा इत्यादी नियतकालिकांमधून कविता प्रकाशित. 'खोल खोल दुष्काळ डोळे' ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.