यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंच यांच्या वतीने देण्यात येणारा डाॅ.कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार-२०२४ योगेश कुलकर्णी लिखित 'कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची' या पुस्तकाला जाहीर झाला आहे. शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.वसंत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद संगोराम, शिवाजी तांबे, डाॅ. वृषाली देहडराय, महेंद्र गणपुले या अभ्यासकाच्या समितीने या पुरस्कार निवडीचे काम केले आहे.

उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०२४ ची निवड करण्यासाठी जी समिती निर्माण करण्यात आली होती, त्या समितीने गेल्या शैक्षणिक वर्षातील पुरस्कारासाठी राज्यभरातून जे ७२ ग्रंथ आले होते. त्या ग्रंथाचे आशय,निर्मितीमूल्य, मांडणी आणि उपयुक्तता या चार निकषाच्या आधारे परीक्षण केले. या पुस्तकांमध्ये शिक्षण विषयक एखादा नवीन प्रयोग मांडण्यात आला आहे का? तो प्रयोग इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरण्याजोग आहे का? याचे परीक्षण करून आणि या पुस्तकांमधून शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत याचा विचार करून शेवटी समितीने 'कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची' या योगेश कुलकर्णी लिखित पुस्तकाला डाॅ.कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार २०२४ मिळाल्याचे जाहीर केले.

या पुस्तकांमधून ग्रामीण भागामध्ये ग्रामीण तंत्रज्ञानाचे प्रयोग डॉ. योगेश कुलकर्णी यांनी यशस्वीपणे पुढे कसे नेले? ग्रामीण तंत्रज्ञानाच्या प्रयोग करून विविध व्यवसाय कशाप्रकारे विकसित झाले. ग्रामीण तरूणांना रोजगार कशाप्रकारे प्राप्त झाला. त्यांतील आत्मविश्वास वाढीस लागून, संशोधन वृत्ती कशी वाढीस लागली.याच्या यशोगाथा या पुस्तकातून मांडण्यात आल्या आहेत. शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मांडण्यात आलेल्या व्यवसायिक शिक्षणाबाबतच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचे काम या विज्ञानश्रमाने गेली कित्येक दशके आधीपासून सुरू केले आहे. या प्रयोगाच्या लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आणखीन तीन पुस्तकाची लक्षवेधक पुस्तके म्हणून निवड करण्यात आली. या पुस्तकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

१- धमाल भटकंती कमाल शिकण्याची- शिवराज पिपडे. (प्रकाशन - ज्ञान प्रबोधिनी ) २-घाट शिकण्या शिकवण्याचा सुचिता पडळकर आणि इंद्रजीत भोसले. ( प्रकाशक - सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर ) ३-माझे शाळेतील प्रयोग-स्मिता गौड (प्रकाशन - राजहंस प्रकाशन) ही तिन्ही पुस्तके शिक्षणप्रेमी वाचकांनी व शिक्षकांनी निश्चितपणे वाचावीत अशी आहेत. या पुस्तकात मांडण्यात आलेले उपक्रम व लेखकांचे अनुभव शिक्षकांना प्रेरणादायक आणि अनुकरण करण्याचे आहे.

सदरील पुरस्कार रविवार, दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित पंधराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.