मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार’ घोषित करण्यात आले. सहा ज्येष्ठ नागरिक आणि एका ज्येष्ठ नागरिक संघाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून येत्या ऑक्टोबर मध्ये मुंबई येथील चव्हाण सेंटर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजी नगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर, मुंबई येथील सलमा खान यांना 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार' देण्यात येणार आहे. तर यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता सन्मान लातूर येथील ज्येष्ठ नागरिक संघास घोषित करण्यात आला आहे.

चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आनंद मेळाव्यात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून नि:स्वार्थपणे काम करत समाजाच्या जडण घडणीमध्ये योगदान देणाऱ्या सहा ज्येष्ठांना व एका ज्येष्ठ नागरिक संघाचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे त्यांनी सांगितले.

सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत; त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ देखील आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा या पुरस्काराचा उद्देश आहे,असे त्यांनी नमूद केले.