यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राष्ट्रीय युवा धोरण २०११ मसुदा चर्चासत्रातील मत
नागपूर, दि. १९(प्रतिनिधी) - जिल्हा पातळीवर विद्यार्थी पार्लमेंटचे आयोजन, क्रीडा क्षेत्रात स्कॉलरशिप तसेच फेलोशिप असायला हवी, इतकेच नाही, तर राष्ट्रीय स्तरावर युवकांचा स्वतंत्र सर्वे होणे गरजेचे आहे, असे मत यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित 'राष्ट्रीय युवा धोरण-२०२१ मसुदा चर्चासत्रात तरूणांनी मांडले. धोरणाची अमंलबजावणी तळागाळापर्यंत व्हायला हवी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण-२०२१ चा मसुदा जाहीर केला असून देशातील तरुणांच्या शिफारशी, दृष्टिकोन आणि मत मागवण्यात आले आहे. या धोरणाद्वारे तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षण, रोजगार व उद्योजकता, नव-नेतृत्वविकास, आरोग्य, क्रीडा व सामाजिक न्याय या बाबींवर मते मागवली आहेत. याच बाबींवर तरुणांची मते जाणून घेण्यासाठी चव्हाण सेंटर तर्फेसंपूर्ण राज्यात एकूण सहा चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी एक आज नागपूर येथील बाबुराव धनवटे सभागृहात पार पडले. या चर्चासत्रात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील तरुणांचा मोठा सहभाग होता.
नागपूर विभागीय आयुक्त पांडे यांनी युवकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी आपण भविष्यात माहिती अधिकार कायद्याचे फायदे आणि वापर यावर कार्यशाळा आयोजित करू असे सांगितले. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या युवकांसाठी पुनर्वसन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उत्तम क्रीडा सुविधा व समान संधी मिळायला हवी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शिक्षण विषयावर चर्चा करतांना आताच्या शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल होणे गरजेचे असून रोजगार व उद्योजकतेचे धडे ग्रामीण भागातच तयार करून तरुणांसाठी उद्योजकता व करियर मार्गदर्शन ग्रामीण पातळीवर शाळा स्तरावर सुरु होणे गरजेचे असल्याचे मत युवा वर्गाने नोंदविले. तसेच युथ एक्सचेंज फोरम, तालुका स्तरीय स्पोर्ट्स आणि जिम्नॅशियम कॉम्प्लेक्स असणे गरजेचे आहे अशा नोंदीही तरुणांनी नोंदवल्या. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांचे मानधन पूर्ववत करणे गरजेचे असून कमवा व शिका ही योजना ग्रामपंचायत स्तरापर्यंत सुरू करणे व अंमलबजावणी सुव्यवस्थित करणे, आदी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सामाजिक न्याय या विषयावर बोलताना हेमलकसा तील लोकबिरादरी या प्रकल्पाचे प्रमुख अनिकेत आमटे यांनी मागास व वंचित युवकांसाठी उच्च शिक्षणासाठी पुर्व तयारी वर्ग घेण्याची गरज आहे, युथ विभाग म्हणून जिल्हा आणि तालुका स्तरावर शासकीय यंत्रणा असणे गरजेचे आहे, असे मत मांडले.
या चर्चासत्रात नागपूर मधील युवक व युवती , सामाजिक महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र तसेच चव्हाण सेंटरच्या युवकांनी सहभाग घेतला,
प्रमुख पाहुणे म्हणून माहिती आयुक्त राहुल पांडे, अनिकेत आमटे, अमोल रणजित देशमुख, विष्णू चांदे, डॉ. शरद सूर्यवंशी, तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरचे रमेश बोरकुटे, सचिव प्रा. कोमल ठाकरे, डॉ. सागर खादिवला, निलेश खांडेकर, अनिल इंदाने आदी उपास्थित होते. चर्चा सत्रात सहभागी झालेल्या तरुणांना राहुल पांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. हा संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन चव्हाण सेंटरचे राज्य संघटक निलेश राऊत, अभिजित राऊत यांनी केले, तर निशिकांत काशीकर, संतोष मेकाले, रोहिणी वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.