मुंबई - 'यशवंतराव चव्हाण सेंटर' निर्मित आणि 'डिजिटिकल वर्क्स' प्रकाशित 'नवोपक्रमांची नवलनगरी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा चव्हाण सेंटर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे आणि ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत सुनीलकुमार लवटे हे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
राज्याचे माजी शिक्षण संचालक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे हे या पुस्तकाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. शिक्षण विकास मंचच्या कोअर कमिटीचे सदस्य तथा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष महेंद्र गणपुले आणि मेंदू व शिक्षण अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या अनुभवी संकलनातून हे पुस्तक साकारले आहे.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या बॅचच्या शिक्षकांनी अतिशय कल्पकतेने नवोप्रक्रम राबवलेले सर्वच उपक्रम नवीन राष्ट्रीय धोरण २०२० मधील तरतुदींशी सुसंगत आहेत. हे उपक्रम घेण्यामागची प्रेरणा समजावी आणि इतर शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना अशाच प्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळावी ही या पुस्तकाची निर्मिती करण्यामागची संकल्पना आहे, अशी माहिती प्रकाशकांनी दिली. त्याचबरोबर हे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे आवाहन करण्यात आले.