अन्य शाळांनी आदर्श घेण्याचे आवाहन
मुंबई दि २ (प्रतिनिधी)- सामाजिक बदल घडू शकतो हे करमाळ्यातील शाळांनी सिद्ध करुन दाखवले आहे. तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यानी लोकसहभागातून निधी उभा करत, शाळा स्मार्ट केल्या आहेत. आज तालुक्यातील प्रत्येक शाळेत प्रयोगशाळा आहे. या शाळेतील मुलांना पृथ्वी क्षेपणास्त्राची देखील परिपुर्ण माहिती आहे, असे सांगत करमाळा तालुक्यातील शाळांचे आणि तेथील अधिकाऱ्यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी भरभरून कौतुक केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने आयोजित 'द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण' विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे काैतुक केले. या शाळेचा आदर्श घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले
तेथील शाळांमध्ये राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी तर होतातच याशिवाय जगभरातील शास्त्रज्ञांच्या जयंती, पुण्यतिथी ती मुले साजरी करतात. त्यांना आईन्स्टाईन पासून आपल्या डॉ. अनिल काकोडकरंपर्यंत कितीतरी शस्त्रज्ञ आणि त्यांचे कार्य तोंडपाठ आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचे काम तेथे करण्यात येते. शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता गट विकास अधिकाऱ्यानी लोकसहभागातून तब्बल १७ लाख रुपये जमा केले आणि त्यातुन हा बदल घडवला आहे. आज या शाळा महाराष्ट्रात एक आदर्श माॅडेल ठरल्या आहेत, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.
सामाजिक बदल घडू शकतो हे करमाळ्यातील शाळांनी सिद्ध करुन दाखवले आहे. या शाळांतील मुलांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी पुण्यातील रक्षा अनुसंधान आणि विकास संगठन म्हणजेच डीआरडीओची एक सफर घडवून आणणार असल्याचे आपण जाहीर केले आहे. या माध्यमातून मुलांनी देशातील संरक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा वाढीस लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या. या शाळांचा आदर्श इतर शाळांनी घेण्याचे आवाहन सुळे यांनी यावेळी केले. त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना सुद्धा करमाळ्यातील शाळांचा अभ्यास करुन तसा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्याचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.