मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘बुवाबाजीविरोधी महिला राज्य परिषद २०२६’ उत्साहात पार पडली. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे ६०० महिला प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही परिषद विशेष यशस्वी ठरली. या परिषदेच्या माध्यमातून बुवाबाजी, अंधश्रद्धा, महिलांचे शोषण आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
परिषदेचे उद्घाटन प्रख्यात कवयित्री नीरजा यांच्या हस्ते अत्यंत अनोख्या आणि प्रतीकात्मक पद्धतीने करण्यात आले. नीरजा आणि अन्य मान्यवरांनी अंधश्रद्धेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या भारतीय महिलेच्या पिंजऱ्याच्या एकेक कड्या सोडवून तिची प्रतीकात्मक मुक्तता केली; याच कड्या पुढे जादूटोणाविरोधी कायद्याच्या कड्या बनून भोंदूबुवाच्या समोर पडतात आणि त्याला तुरुंगात जावे लागते, असा प्रभावी संदेश यातून देण्यात आला. याप्रसंगी बोलताना नीरजा यांनी धर्माच्या राजकारणामुळे होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नुकसानीबद्दल चिंता व्यक्त करत, अशा परिस्थितीत समाजपरिवर्तनाची मोठी जबाबदारी 'अंनिस'वर असल्याचे सांगितले. १९६०-७० च्या दशकातील चौकस वृत्तीचा दाखला देत त्या म्हणाल्या की, पूर्वी चंद्रावर माणूस गेल्यानंतर संकष्टीचा उपवास सोडणाऱ्या वृद्धा होत्या; मात्र आज प्रश्न विचारणे अवघड झाले असून भोंदूबुवांकडे जाणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिलांनी कर्मकांड आणि दैववादावर विश्वास न ठेवता मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर समाजात वावरावे आणि महाराष्ट्राचे पुरोगामित्व जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे होते, तर सुरुवातीला यशवंतराव चव्हाण सेंटरच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी लघुपटिका दाखवण्यात आली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात बनसोडे यांनी भोंदूबुवांकडून उच्चशिक्षित व्यक्तींचीही फसवणूक होत असल्याबद्दल खंत व्यक्त करत, महिला व युवतींनी हा लढा व्यापक करून शोषणमुक्त आणि समतायुक्त महाराष्ट्र घडवण्याचे आवाहन केले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष शामराव पाटील यांना डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी 'अंनिस'च्या कार्याचे कौतुक केले आणि अंकशास्त्रासारख्या छद्मविज्ञानावर टीका करत सोशल मीडियावर अंधश्रद्धेविरोधात भूमिका घेणाऱ्यांना होणाऱ्या ट्रोलिंगकडे लक्ष वेधले. या सत्राचे सूत्रसंचालन आरती नाईक यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रियंका सवाखंडे यांनी, प्रास्ताविक ॲड. रंजना गवांदे यांनी, तर आभारप्रदर्शन गायत्री आडे यांनी केले.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या विषयावर ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर आणि डॉ. अनिल डोंगरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन भोंदूबाबांकडून होणाऱ्या शोषणाचे विश्लेषण करताना, महिलांनी अन्यायकारक रूढींच्या बेड्या तोडून विवेक आणि तर्काच्या आधारावर वाटचाल करावी, असे मत त्यांनी मांडले; तसेच पीडितांच्या पुनर्वसनासाठी समितीने अधिक सक्रिय राहण्याची गरज व्यक्त केली. या सत्राचे सूत्रसंचालन कविता मते यांनी केले. त्यानंतर तिसऱ्या सत्रात ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या परिसंवादात प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शीतल वसावे आणि गौरी जाधव यांनी तरुणाईच्या दृष्टिकोनातून डाकीण प्रथा, ऑनलाइन फसवणूक आणि अध्यात्माच्या नावाखाली होणारे महिलांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण यावर परखड मते मांडली. या परिसंवादाचे प्रास्ताविक यश सूर्यवंशी यांनी, तर सूत्रसंचालन इरा बालगुडे यांनी केले.
परिषदेच्या समारोप सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांनी चित्रपट आणि नाटकांतील अंधश्रद्धाविषयक आशयाबाबत कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनीही सजग राहण्याची गरज अधोरेखित केली. महिलांनी असुरक्षितता आणि भय यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मुकाबला करून पुरुषप्रधान मानसिकता बदलण्यासाठी पुढे यावे, असे त्या म्हणाल्या. समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी राज्यभर राबवण्यात येत असलेल्या बुवाबाजीविरोधी अभियानाचा आढावा घेतला. या सत्रात सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले; ज्यात जादूटोणाविरोधी कायद्याची नियमावली तयार करणे, संपूर्ण देशात हा कायदा लागू करणे आणि २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा खर्च कमी करून उर्वरित निधी दुष्काळ निवारणासाठी वापरणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. रुक्साना मुल्ला यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सत्राचे आभार मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी मानले आणि ‘हम होंगे कामयाब’ या सामूहिक गीताने परिषदेची सांगता झाली.
या राज्यस्तरीय परिषदेच्या यशस्वी आयोजनात यशवंतराव चव्हाण सेंटरने मोलाची भूमिका बजावली. सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, महिला विभाग प्रमुख प्रशांत ईखार, शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे यांच्यासह मिनल सावंत, वंदना वाळिंजकर, सुकेशनी मर्चंडे आणि मनीषा खिल्लारे यांनी उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापनासाठी विशेष योगदान दिले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य आणि मुंबई शाखेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.



