पुणे, दि. १ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्राप्त असीम अमोल चाफळकर यांनी लिहिलेले आधुनिक जीवशास्त्राची साधने ‘जनुककोशशास्त्र’ हे पुस्तक 'मधुश्री पब्लिकेशन' या प्रकाशन संस्थेमार्फत प्रकाशित केले जाणार आहे.
आदरणीय पवार साहेबांच्या उज्ज्वल कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी, शिक्षण आणि साहित्य या तीन विभागांमध्ये शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान केली जाते. पहिल्या वर्षी साहित्य फेलोशिप मध्ये विज्ञान या प्रकारासाठी असीम अमोल चाफळकर यांची निवड झाली होती.
या फेलोशीपसाठी निवड समितीमार्फत गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येते. साहित्य फेलोशिप साठी निवडल्या गेलेल्या फेलोंना त्यांच्या विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शकातर्फे वैयक्तिक मार्गदर्शनही केले जाते. तसेच वर्षातून तीन ते चार लेखन कार्यशाळांचे आयोजनही केले जाते. या सर्व कार्यशाळा आणि लेखन प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून लेखनाची नवनवीन तंत्रे फेलो आत्मसात करतात.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने चव्हाण सेंटरच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.