मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यावर्षीपासून शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) सुरू करण्यात आली आहे. यासाठी एकूण दहा फेलोंची निवड करण्यात आली असून संकेत स्थळावर त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' १२ डिसेंबर २०२१ या वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते. यावर्षीपासून प्रथमच बालशिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन (बालशिक्षण) सुरू करण्यात आली आहे. फेलोशिपसाठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. २४ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. यास राज्यभरातून भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातूनच एकूण १० फेलोंची निवड केली आहे, अशी माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत वय वर्षे ३ ते ८ या कालावधीला शिक्षणाचा ‘फाऊंडेशनल स्टेज’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ताराबाई मोडक, अनुताई वाघ, सिंधूताई अंबिके यांसारख्या थोर व्यक्तींनी बालशिक्षणाचे पायाभूत काम केले आहे. आज अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर, CDPO आणि सहकारी हे काम पुढे नेत आहेत. या क्षेत्राला संशोधनाची जोड देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरने ही फेलोशिप सुरू केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील बालशिक्षण अधिक सुदृढ होईल.असे खासदार सुळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.
बालशिक्षण फेलोशिपसाठी निवड झालेल्या फेलोंची नावे https://www.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर पाहता येतील. या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुळे यांनी सर्वांचे आभार मानून फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन केले असून यावर्षी फेलोशिप न मिळालेल्या उमेदवारांनी निराश न होता; पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
निवड झालेल्या फेलोंची यादी खालीलप्रमाणे
- १. नीलम दीपक जगदाळे - सातारा
- २. कल्पना भास्कर गारे - पालघर
- ३. शीतल शंकर पाठक - अहिल्यानगर
- ४. प्रज्ञा दत्तात्रय शेंपुडे - रायगड
- ५. अस्मिता बिर्जे - रायगड
- ६. उन्नत सांगळे - ठाणे
- ७. भावना भानुदास पाटील - नाशिक
- ८. मुन प्रल्हाद रायपुरे - नागपूर
- ९. बुद्धपाल डुमने - नांदेड
- १०. आकाश रामचंद्र गोरे - पुणे