मुंबई: स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे जनतेचे जीवन सुसह्य करणे. शासन कुणाचेही असले तरी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. त्यासाठी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे न्यायला पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. यशवंतराव चव्हाण सेंटरने आयोजित केलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रांमध्ये निरनिराळ्या समाजघटकांसाठी कार्य करणाऱ्या संविधानप्रेमी, लोकशाहीवादी विचारांच्या सर्व स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांचे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच, साहित्यिक, कलावंत, पत्रकार यांच्या एक-दिवसीय राज्यव्यापी विचारमंथन व निर्धार परिषदेत ते बोलत होते. या एक-दिवसीय परिसंवादामध्ये जे जे मुद्दे मांडले गेले, त्यांची सोडवणूक करणे आणि त्याद्वारे जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी चव्हाण सेंटर कायम ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नवीन शिक्षण धोरणाविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, शाळा बंद करून पुढच्या पिढीला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. महिलांवर मुलींवर होणारे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्याला शोभनीय नाहीत असे सांगून सध्या राज्यात समाजात जे असहिष्णू वातावरण निर्माण होत आहे, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
परिषदेच्या निमंत्रक चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष यावेळी म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण सेंटर ही अराजकीय संस्था असून येथे राजकारणविरहित दृष्टी ठेवून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काम केले जाते. आपल्या भाषणात समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासाठी चव्हाण सेंटर कार्यरत आहे, त्यासाठी राज्याच्या सर्व महसुली विभागांमध्ये अशा परिषदा आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य आहे. सशक्त लोकशाहीसाठी जनतेच्या प्रश्नांवर सामाजिक संघटनांना आंदोलने करण्याचा अधिकार आहे, तो अबाधित राहिला पाहिजे. आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता हे सामान्य जनतेचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यांची जपणूक करणे शासनाची नैतिक जबाबदारी असते, असे त्यांनी सांगितले.
परिषदेस चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले तसेच सामाजिक चळवळींमध्ये कार्यरत असणाऱ्या, प्रतिभा शिंदे, उल्का महाजन, अॅड. जयदेव गायकवाड, नितीन वैद्य, डॉ. शाम मानव, सुभाष लोमटे, सुरेश खोपडे, सुभाष वारे आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांनी केले.