मुंबई, दि.९ डिसेंबर : तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने होतोय तसाच दिव्यांगांच्या आयुष्यात देखील व्हायला हवा आणि दिव्यांग देखील आत्मनिर्भर व्हायला हवेत, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त "बढते कदम की ओर..." या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या परिसंवादात सुरुवातीला योगिता तांबे यांनी तबला वादन केले. संगीत, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग तसेच समाजमाध्यमे या क्षेत्रांमध्ये जे दिव्यांग आपापल्या परीने छाप उमटवत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांना साथ मिळावी या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन चव्हाण सेंटरमार्फत करण्यात आले होते.
दिव्यांगांसाठी उपलब्ध औषधांची नावे ब्रेल लिपी मध्ये देखील असायला हवीत, असे प्रतिपादन परिसंवादातील पहिल्या सत्रात अनुजा संखे यांनी केले. पहिल्या सत्रात योगिता तांबे, नवनीत कुलकर्णी, अनुजा संखे यांची मुलाखत अमुक तमुक या यूट्यूब चॅनलचे ओंकार जाधव आणि शार्दुल कदम यांनी घेतली. तसेच दुसऱ्या सत्रात मिनाक्षी निकम, फरीदा लांबे, अभिजीत राऊत, सुमित पाटील, कविता मुरूगकर यांची मुलाखत दिपिका शेरखाने यांनी घेतली.
चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले, सीईओ दिप्ती नाखले, विजय कान्हेकर, आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभागाच्या प्रमुख दिपीका शेरखाने, मनिषा खिल्लारे, वंदना जगताप यांच्यासह अनेक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.