विविध क्षेत्रातील सहाजणींना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सन्मान पुरस्कार प्रदान
पुणे, दि. २३ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सामाजिक, साहित्य, कृषी, उद्योजकता, पत्रकारिता आणि क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रात उल्लेखणीय कार्य केलेल्या सहा यशस्विनींना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते आज पहिला यशस्विनी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे उपस्थित रहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. इतकेच नाही, तर महिलांसाठी कार्य करणाऱ्या पुरुषांचाही सन्मान व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आजच्या या कार्यक्रमात कुरखेडा, जि. गडचिरोली येथील शुभदा देशमुख यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबाबत 'यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. तुळजापूर येथील गोदावरी डांगे यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल 'यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कारा'ने तर महाड येथील उद्योजिका शीला साबळे यांना 'यशस्विनी उद्योजकता पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. 'यशस्विनी साहित्य पुरस्कारा'ने प्रख्यात लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांना तर पत्रकार जान्हवी पाटील यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात आला. महिलांसह पुरुष कबड्डीपटू घडविणाऱ्या कबड्डी प्रशिक्षक सिमरत गायकवाड यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षण सन्मान पुरस्कार' देण्यात आला.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित रहात खासदार सुळे यांनी, महिलांसाठी पहिले महिला धोरण पवार साहेबांनी २२ जून १९९४ साली आणले होते. या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे म्हणूनच याच तारखेला हे सन्मान केले जात असल्याचे स्पष्ट केले. महिलांनी निर्णय प्रक्रियेत जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शाहू फुले आंबेडकर यांनी महिलांसाठी महत्वाचे कार्य केले आहे. महिलांना मिळालेले अधिकार पुरुषांमुळेच मिळालेले आहेत. त्यामुळे महिलांसाठी काम करणाऱ्या पुरुषांनाही पुढील वर्षापासून पुरुषांनाही सन्मानित करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जेष्ठ विचारवंत डॉ आ. ह साळुंके यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी इतिहासातील कर्तृत्ववान महिलांचा दाखला देत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या महिला कोणत्याही क्षेत्रात कमजोर नाहीत, असा त्यांचा गौरव केला. महिलेला कमी लेखण्याची आपल्या देशाची परंपरा अनाठायी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार फाैजिया खान, वंदना चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी महापाैर प्रशांत जगताप, यशवंतराव चव्हाण सेंटरचे पुणे जिल्हा केंद्र सचिव अंकुश काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते. अत्यंत हृद्य असा झालेल्या कार्यक्रमात पुरस्काराला उत्तर देताना शुभदा देशमुख यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. या पुरस्काराने आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगत त्यांनी काम करण्यास अजून बळ मिळाल्याचे नमूद केले. याप्रसंगी, शीला साबळे, गोदावरी डांगे, मनस्विनी लता रवींद्र, सिमरत गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. गौरव मालक आणि निकिता बहिरट या तरुण विद्यार्थ्यांनी अत्यंत ओघवत्या शब्दात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.