मुंबई, ता. २५: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयंसिगराव पवार यांनी आपले आयुष्य इतिहासलेखन आणि संशोधनासाठी खर्ची घातले. त्यातून त्यांनी इतिहासाचे वास्तविक चित्र मांडले. त्यांचे संशोधन हे नव्या पिढीसाठी इतिहासाचा एक अखंड तप आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२४' डॉ. जयसिंगराव पवार यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, सखोल अभ्यास करून डॉ. जयसिंगराव पवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास समाजासमोर आणला. शाहू महाराज, महात्मा फुले, आदी महापुरूषांचे कार्य महाराष्ट्राबाहेर नेणाऱ्या इतिहासकारांमध्ये जयसिंगराव यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. यावेळी पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आणि देशासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. उद्याचा महाराष्ट्र कसा उभा करायचा, हे स्वप्न त्यांच्या मनात होते. त्या दृष्टीकोनातून त्यांनी काम केल्याचे पवार म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांचा वसा आणि वारसा पुढे चालवला. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. ज्याप्रमाणे मराठ्यांच्या इतिहासात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, महाराणी ताराबाई यांची नावे गाळता येणार नाहीत, तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांनी नावे कधीच गाळता येणार नाही. दरम्यान, यावेळी जयसिंगराव पवार यांनी शिवाजी महाराज यांच्या गुरूंच्या संदर्भात झालेल्या वादावरील संशोधन आणि मेहंदळे यांनी केलेल्या वादाच्याही आठवणीही सांगितल्या.

यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर, उपाध्यक्ष अरुण गुजराती, सचिव हेमंत टकले, कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यावेळी डॉ अनिल काकोडकर यांनी केली. डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना १२ मार्च २०२५ रोजी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.