मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आगामी पाच वर्षात एक हजार फेलोज तयार करून महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती, चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

आदरणीय पवार साहेबांच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या फेलोशिप प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. फेलोशिप चे हे चौथे वर्ष असून गुणवत्ता असूनही अनेक जण संधी नसल्यामुळे पुढे येत नाहीत, त्यांना न्याय देण्यासाठी ही फेलोशिप सुरु करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वर्षी कृषी साठी ७१, साहित्य साठी १२ आणि शिक्षण फेलोशिप साठी ३० अशा एकूण ११३ फेलोंची निवड करण्यात आली असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी फेलोंना फेलोशिप प्रदान करण्यात आली.

डाॅ. अनिल काकोडकर, डॉ सी.डी. माई, डॉ.एस.एस.मगर, विवेक सावंत, हेमंत टकले, निलेश नलावडे, विलास शिंदे, प्रा. डॉ नितीन रिंढे, अदिती नलावडे, दिप्ती नाखले यांच्यासह चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, फेलोज, त्यांचे पालक आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

आपण एक वर्षासाठी फेलोशिप देत आहोत, पण त्या फेलोंना एक वर्षानंतर देखील मार्गदर्शन किंवा मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आगामी काळात या फेलोंनी आपल्या गुणांच्या आणि ज्ञानाच्या जोरावर राज्यासाठी आणि देशासाठी जास्तीत जास्त काम करावे, अशी अपेक्षाही खासदार सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात एक महिला स्वयंपूर्ण झाली तर ती आपल्याबरोबर इतर महिलांनाही प्रशिक्षण करुन स्वयंपूर्ण बनवू शकते. त्यासाठी आगामी काळात महिला फेलोशिप सुरु करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

विज्ञान तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी आनंद आणि सुखासाठी माणसेच लागतात, आणि हीच माणसे जोडण्याचे काम यशवंतराव चव्हाण सेंटर करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच फेलोशिपसाठी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती, एम.के.सी.एल. फाऊंडेशन आणि सह्याद्री फॉर्म्स नाशिक यांचे सहकार्य लाभत आहे, त्याबद्दल त्यांचे अभारही त्यांनी मानले.