चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खा. शरद पवार, कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांची प्रमुख उपस्थिती
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई आणि महोत्सवाचे मीडिया व्यवस्थापक गणेश मतकरी हे देखील उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या जगभरातील चित्रपटांचे स्वागत खासदार शरद पवार यांनी केले. आजकालच्या चित्रपटांबद्दल निरीक्षण नोंदवताना ते म्हणाले पूर्वीप्रमाणे आपल्या कला, संगीत आणि संस्कृतीद्वारे आपले विचार व्यक्त करण्यास मोकळे आहोत की कोणीतरी आपल्या विचारांवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करीत आहे? आपल्या कलाकृतीद्वारे लोक मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नसतील तर ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले. डॉ. पटेल यांनी बोलाताना स्पष्ट केले की, ज्या शहरामध्ये चित्रपट महोत्सव भरवला जातो त्याच शहराचे नाव महोत्सवास दिले जाते. परंतु महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने हा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबई शहरात भरवला जातो. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी चित्रपटांचे सामर्थ्य या विषयावर प्रकाश टाकताना डॉ. जब्बार पटेल यांची निर्मिती असलेल्या सामना आणि सिंहासन या चित्रपटांची आठवण करून दिली. आजच्या काळात अशा राजकीय भाष्याला चित्रपटांमध्ये परवानगी मिळेल का? अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभानंतर ‘द होली स्पायडर’ या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यंदा चित्रपट रसिकांसाठी २७ जागतिक चित्रपट, ३ भारतीय चित्रपट, ३ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेत सोनाली कुलकर्णी आपले विचार मांडणार आहेत. तसेच, १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान मुंबईकरांना या चित्रपट महोत्सवाचा आनंद घेता येईल. भारत, चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल, तुर्की आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची संधी या चित्रपट महोत्सवामुळे उपलब्ध झाली आहे.