मुंबई : सध्याच्या काळात दारू बंदी करणे कोणालाही शक्य नसले तरी दारूमुक्तीसाठी दारूबंदी नव्हे, तर दारू नितीची गरज आहे. दारूबंदी केल्याने फार तर दारू पिणारयांचे प्रमाण कमी होईल पण ते शून्यावर येऊ शकत नाही. मात्र दारू नीती अमलत आणली तर व्यसानाधीतेला अटकाव केला जाऊ शकतो, असे प्रसिद्ध समाजसेवक व विचारवंत डॉ. अभय बंग यांनी प्रतिपादन केले. ते यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित कै. श्री शरद काळे स्मृती व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी श्री. शरद काळे यांचे ३१ मार्च २०२३ रोजी दुख:द निधन झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने चव्हाण सेंटरतर्फे २५ जून २०२४ रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत चव्हाण सेंटर, मुंबई येथे डॉ. अभय बंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. “भारतात अल्कोहोल: वैज्ञानिक भूमिका व सामाजिक उपाय” या विषयावर डॉ. बंग यांनी उपस्थितांना मार्दर्शन केले. डॉ. बंग ‘सर्च’ या संस्थेमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन कार्य करतात. त्यांचे स्वानुभव सांगताना ते म्हणाले की, दारू नीतीची अंमलबजावणी करून मद्यापान करणाऱ्यांचे प्रमाण गडचिरोलीत ६८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गडचिरोलीत राबवण्यात येत असलेला मुक्तीपथ हा महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प ठरू शकेल.
या स्मृती व्याख्यानाच्या आयोजनामध्ये शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रथम’ ही स्वयंसेवी संस्था तसेच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई यांचाही पुढाकार आहे. यावेळी चव्हाण सेंटरचे सरचिटणीस श्री. हेमंत टकले, माजी मुख्य सचिव श्री. अजित निंबाळकर, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक-संचालक श्रीमती फरीदा लांबे, एशिअटिक सोसायटीच्या अध्यक्ष प्रो. विस्पी बालापोरिया, विविध स्तरातील अनेक मान्यवर, दिवंगत श्री. काळे यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अभय बंग यांच्या हस्ते अनघा प्रकाशनचे श्री. मुरलीधर नाले यांनी श्री. शरद काळे यांच्या विषयीच्या लेखांचे संपादन केलेल्या “शरदाचे चांदणे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
श्रीमती फरीदा लांबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शेवटी चव्हाण सेंटरच्या सीईओ, दिप्ती नाखले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्ता बाळसराफ यांनी केले.