पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर, स्वरूप चॅरिटेबल फाउंडेशन, ठाकरसी ग्रुप मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डिजिटल श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वाटप शिबीर पार पडले. हे दोन दिवसीय शिबीर दि. २७ आणि २८ डिसेंबर रोजी निसर्ग कार्यालय, पुणे घेण्यात आले. २०४ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या उपक्रमांतर्गत सुरुवातीला कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये आढळून आलेल्या ऐकू न येण्याच्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना श्रवणयंत्र मोफत वाटप करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २०१३ पासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून तब्बल चाळीस हजार हून अधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
चव्हाण सेंटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे या करत असलेल्या या स्तुत्य उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली असून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये सुद्धा त्याची नोंद झाली आहे. बालेवाडी येथे २०१९ मध्ये झालेल्या श्रवणयंत्र वाटप शिबिरात एका दिवसात म्हणजे अवघ्या ८ तासात तब्बल ४ हजार ८०० लाभार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले होते.