यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित 'राष्ट्रीय युवा धोरण २०२१ मसुदा चर्चासत्रातील मत
अमरावती, दि. २० (प्रतिनिधी) - देशातील प्रत्येक कॉलेज आणि शाळेत क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज आहे,असे मत अमरावती जिल्ह्यातील तरुणाईने आज मांडले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित 'राष्ट्रीय युवा धोरण २०२१ मसुदा चर्चासत्राला अमरावतीकरांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण-२०२१ चा मसुदा जारी केला असून देशातील तरुणांच्या शिफारशी, दृष्टिकोन आणि मत मागवले आहेत. या धोरणाद्वारे तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षण, रोजगार व उद्योजकता, नव-नेतृत्वविकास, आरोग्य, क्रीडा व सामाजिक न्याय या बाबींवर देशातील तरुणांची मते मागवली आहेत. याच बाबींवर तरुणांची मते जाणून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सहा चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून त्यातील एक आज अमरावती येथे पार पडले. या चर्चासत्रात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, क्षेत्रातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आपली मते मांडली.
युवा धोरणाचे विकेंद्रीकरण करणे तसेच दिलेल्या विषयाच्या विभागाकडून कामकाज न करता स्वतंत्र विभाग असणे गरजेचे आहे. रोजगार संबंधी मते मांडताना रोजगारासाठी ग्रामीण क्षेत्रात जास्तीत जास्त निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. त्या नुसार धोरणात तरतूद करण्यात यावी. ग्रामीण पातळीवर केंद्र सरकारच्या कार्यप्रणाली असणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा यावेळी तरुणांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायत स्तरावर युवा परिषदेची स्थापना करणे तसेच त्यासाठी निधी उपलब्ध करणे व विद्यालये आणि विद्यापीठांमध्ये युवांसाठी थिंक टॅंक ची निर्मिती करणे. तालुका स्तरीय कृषी संमेलन चे आयोजित करणे आणि कृषी चे सुद्धा थिंक टॅंक तयार करणे.महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी पूर्व तयारी कार्यशाळा घेणे हे अतिमहत्वाचा भाग म्हणून समावेश करण्यात यावा, असेही मत यावेळी नोंदविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता देशमुख, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर भिसे, डॉ. रमेश अंधारे, प्रदीप देशमुख उपास्थित होते. या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे संतोष मेकाले, जिल्हा युवा समन्वयक मनिष गायकवाड यांनी परिश्रम घेतले.