मुंबई (दि.३०) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला फोरमतर्फे आयोजित पाच दिवसीय पॅरा लीगल ट्रेनिंग कोर्सला प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा ट्रेनिंग कोर्स दिनांक २५ जुलै ते २९ जुलै या कालावधीत पार पडला.
पॅरालीगल म्हणजे काय?, सहकार कायदे, माहितीचा अधिकार, नागरी सेवा हक्क, महिला सबलीकरण आणि संबंधित कायदे, भारतीय संविधान –मानवी हक्क व कायदे, बाल संरक्षण व संबंधित कायदे या सर्व विषयांची माहिती देण्यात आली. ॲड.वसंत गुरव, ॲड.प्रकाश धोपटकर, ॲड.अभिजित सावंत, अनिकेत कुरणे तसेच विभागाचे प्रमुख ॲड. जयमंगल धनराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कोर्स साठी ६३ जणांनी सहभाग नोंदवला होता. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रोफेसर रणजित बायस हे देखील उपस्थित होते. प्रमाणपत्र वाटपानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.