मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्यातर्फे दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो. सन २०२४ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना जाहीर झाला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच १२ मार्च २०२५ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.

चव्हाण सेंटरतर्फे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या नामवंत व्यक्ती किंवा संस्थेला 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. पाच लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नाव आहे. डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पथदर्शी ठरलेला ग्रामीण आरोग्य सेवा कार्यक्रम विकसित केला आहे. या डॉक्टर दांपत्याने दारूविरोधी मोहिम राबविली, ज्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. त्यांनी तंबाखू आणि दारूचे सेवन कमी करण्याच्या उद्देशाने 'मुक्तिपथ' ची संकल्पना मांडली आणि त्याचे नेतृत्व केले. डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांना २०१८ मध्ये भारत सरकारने 'पद्मश्री' देऊन सन्मानित केले आहे.