पुणे, दि. २० (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे राजकारण चांगल्या दिशेने चाललंय, की नाही हे मला माहीत नाही पण समाजकारण मात्र अगदी योग्य दिशेने चालले आहे. हे मी खात्रीशीर सांगू शकते, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे मांडले.
यशवंतराव चव्हाण सेंटर, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानसशास्त्र विभाग, कर्वे समाजसेवा संस्था-पुणे आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने काल आयोजित करण्यात आलेल्या 'शोध आनंदी जीवनाचा- राज्यस्तरीय मानसिक आरोग्य परिषदे'त प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या परिषदेत 'मन म्हणजे काय ? मनाचे आरोग्य का महत्वाचे आहे' या विषयावर प्रसिद्ध समुपदेशक डॉ. सुवर्णा बोबडे, 'मानसिक स्वास्थ्य : सद्यस्थिती आणि आव्हाने' या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर, 'मनोरुग्णांची काळजी आणि व्यवस्थापनामधील पालक व संस्थांची भूमिका' या विषयावर डॉ. चंद्रशेखर देसाई, आणि 'मानसिक आरोग्य - कायद्याची सकारात्मक अंमलबजावणी आणि संसाधनाची उपलब्धता या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. राजेंद्र म्हस्के, दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे निरीक्षक प्रशांत गायकवाड, जिल्हा समाजकल्याण आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
शहरातील विविध महाविद्यालयांत मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करणारे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर या परिषदेला उपस्थित होते. परिषदेतील मुख्य मार्गदर्शनानंतर चर्चासत्र व प्रश्नोत्तरे झाली. यावेळी बोलताना 'मानसिक आरोग्य हा समाजाच्या दृष्टीने विषय एकदम गंभीर आहे', असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'समाजात भावना असतात हे कोविडने आपल्याला शिकवले. त्या काळात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एकमेकांची मदत केली. ही सामाजिक भावना अत्यंत मोलाची आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा, तर महाराष्ट्राचे राजकारण आज योग्य दिशेने चाललंय की नाही, हे मला सांगता यायचे नाही, पण समाजकारण मात्र अगदी योग्य दिशेने चालले आहे'. मानसशास्त्र आणि मानसिक आजारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, 'मानसिक आरोग्यासंबंधी काही आजार असतील तर मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला कोणीही लाजू नये.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संयोजक विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविक केले. दीपिका शेरखाने यांनी चव्हाण सेंटरच्या कामाचा आढावा घेत पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. सुकेशीनी मर्चंडे यांनी आभार मानले.