यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून बारामती येथे कार्यक्रम
बारामती दि ८(प्रतिनिधी)- बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने तसेच सेंटरच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून दिव्यांगांसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र वाटप सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात आजपर्यंत ४४५ जणांना दिव्यांग प्रमाणपत्र आणि कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र म्हणजेच युडीआयडी कार्डची आवश्यकता असते. दिव्यांगाना प्रमाणपत्र वेळेत आणि सोप्या पद्धतीने मिळावेत यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत बारामतीत १२ फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ही खास सुविधा सुरु करण्यात आली आहे. प्रमाणपत्र आणि कार्ड देण्यासाठी सुविधा केंद्रावरच तपासणी आणि निदान करण्यात येत असल्याने दिव्यांगांच्या वेळेची बचत होत आहे. या सुविधेचा बारामती तालुक्यासह पुरंदर, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनाही फायदा होत आहे. तीन महिन्यातील ५५० व्यक्तींची तपासणी करून ४४५ जणांना दिव्यांगत्व प्रमाणपत्रासह ई-रेल्वे कार्ड आणि विविध शासकीय योजनांचे माहितीपत्रक देण्यात आले आहे. सुविधा केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु असते.
या सुविधा केंद्राचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तपासणी, निदान आणि प्रमाणपत्र, कार्ड एकाच छताखाली भेटत असल्याने दिव्यांगानी ही सुविधा सुरु केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर, आरोग्य मंत्रालय, आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत.