मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘संविधान दालन’ सुरु करण्यात आले. या दालनाचे उद्घाटन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे द्यांच्या हस्ते करण्यात आले. संविधानावरील व्याख्याने, संविधान प्रश्नमंजुषा कार्यशाळा व शिबिरे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन भविष्यात या दालनात करण्यात येईल, अशी माहिती सेंटरकडून देण्यात आली.
संविधानाची उद्दिष्टे आणि मुल्ये सर्व सामान्यांपर्यंत पोहचावीत, या उद्दिष्टाने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने संविधानिक चर्चा, व्याख्याने, शिबिरे, कार्यशाळा,संविधान परिचय वर्ग तसेच महाराष्ट्रातील शालेय शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी ऑनलाईन संविधान प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर या संविधान दालनाचे उद्घाटन केले आहे.
याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आपला देश संविधानावर चालतो. सर्वजण सद्यस्थितीबाबत बोलायला घाबरत आहेत. ईस्ट इंडियाच्या काळातील स्थिती पुन्हा एकदा येऊ लागली आहे. त्यामुळे आज संविधान समजून घेणे जास्त महत्वाचे आहे. केंद्र सरकारने सर्व शाळांना एक स्पर्धा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात केंद्र सरकारच्या योजनांवर आधारीत चित्रे काढायची आहेत. याचा सगळा खर्च मुख्याध्यापकांना करायचा आहे. पण त्याऐवजी संविधानावर स्पर्धा घ्यावी असेही त्यांनी नमूद केले. या संविधान प्रदर्शनातून प्रचार प्रसार करण्यात येणार आहे. अनेक सुशिक्षित महिलांना देखील त्यांचे अधिकार माहित नाही. आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत संविधानाचा अर्थ पोहोचवायचा आहे. ही जबाबदारी आपण नक्की पार पाडू असा विश्वास यावेळी खासदार सुळे यांनी व्यक्त केला.