मुंबई - ‘माझ्या स्वत:वरही चित्रपटांचा खोल परिणाम झालेला आहे. सिनेमा तुमच्या विचारांना आकार देऊ शकतो. त्यांचा सरसकट एकसारखा परिणाम होणार नाही कदाचित, पण स्वतंत्रपणे प्रत्येकावर चित्रपट आपला ठसा निश्चित सोडतात’, असं वक्तव्य प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्री श्रीराम राघवन यांनी केलं. चौदाव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यंदा महोत्सवाची केंद्रसंकल्पना ‘सिनेमा इज होप’ अशी आहे. श्री राघवन म्हणाले, की या माध्यमात दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडवण्याच्या आणि समाजाला चांगलं वळण देण्याच्या अनेक शक्यता दडलेल्या आहेत. श्री राघवन यांनी त्यांच्या शालेय जीवनापासून ते गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘मेरी क्रिस्मस’ या चित्रपटापर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख याविषयी बोलताना केला. ‘आजच्या काळात पहाण्यासाठी भाराभर गोष्टी उपलब्ध असताना चित्रपट महोत्सवांचा विशेष फायदा आहे, कारण काळजीपूर्वक निवड केलेले दर्जेदार चित्रपट पहाण्याची ही मोठी संधी असते’, असंही ते म्हणाले.
महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी १४ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपटाबद्दल अधिक माहिती दिली. रसिक प्रेक्षकांना जगभरातले तसच भारतातलेही महत्वाचे चित्रपट इथे उपलब्ध होत आहेत हे सांगताना इथे दाखवण्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या निवडक चित्रपटांचा महोत्सव असतो आणि तो भरवण्याची कल्पना श्री. शरद पवार यांना प्रथम सुचली, असं डॉ.पटेल आपल्या भाषणात म्हणाले.
उद्घाटन प्रसंगी श्री राघवन यांच्या हस्ते महोत्सवाच्या कॅटलॉगचं प्रकाशन झालं. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ श्रीमती दिप्ती नाखले यांनी समारंभाचं सूत्रसंचालन केलं आणि जनरल सेक्रेटरी श्री. हेमंत टकले यांनी आभार मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘डू नॉट एक्स्पेक्ट टू मच फ्रॉम द एंड ऑफ द वर्ल्ड’ हा राडू ज्यूड दिग्दर्शित रुमेनिआचा चित्रपट दाखवण्यात आला. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन दर वर्षी यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे फिल्म फाऊंडेशन, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने केलं जातं. यंदा हा महोत्सव १ ते ७ फेब्रुवरी या काळात यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, येथे भरवण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी श्री. गणेश मतकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.