पुणे, दि. ३१ जुलै (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कारासाठी’ अर्ज करण्याचे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी केले. चव्हाण सेंटरच्या वतीने युवांसाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पुरस्कार दिले जातात. याचाच एक भाग म्हणजे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार आहे.
राज्यातील साहित्य, उद्योजक, सामाजिक, क्रीडा, रंगमंचीय कलाविष्कार, पत्रकारिता आणि इनोव्हेशन या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. रुपये २१ हजार, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या सर्व पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे, अशी माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.
पुरस्काराच्या अटी-शर्ती, नियम वाचण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या https://youthawards.chavancentre.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन सुळे यांनी केले आहे. या वेबसाईटवरील फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.