पुणे -यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'अभिसरण' या उपक्रमांतर्गत विदर्भातील युवक-युवतींना पाच गटांत विभागून सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत पाठविण्यात आले. दिनांक ९ मे २०२३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा समारोप काल दिनांक १९ मे २०२३ रोजी झाला. या समारोप कार्यक्रमास चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
या उपक्रमा दरम्यान सर्व युवांची प. महाराष्ट्रातील परिसर फिरण्याची जिद्द, सर्व विषय जाणून घेण्याची जिज्ञासा, सर्व युवांनी दाखविलेला उत्साह याबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे कौतुक केले. उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, लोकांना या उपक्रमाबद्दल आता कुतुहल वाटते ही जमेची बाजू आहे. आज या सर्व मुलांचे अनुभव ऐकून समाधान वाटले. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक कसा करता येईल यावर आपण सर्वजण मिळून काम करूया.
यशवंतराव चव्हाण सेंटर मार्फत मागील चौदा वर्षापासून 'अभिसरण - युथ एक्सचेंज प्रोग्राम ' आयोजित करण्यात येतो. यावर्षी विदर्भ ते पश्चिम महाराष्ट्र ही संकल्पना होती. या माध्यमातून विदर्भातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्र समजून घेता आला. प्रत्येक जिल्ह्यातील संस्कृती, विविध परंपरा, चालीरीती, त्या भागातील इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न सहभागी युवांनी केला. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जीवनमान समजावून घेतले. यामध्ये शेती व प्रमुख पिके, भौगोलिक वैशिष्ट्ये, ऐतिहासिक वारसा व परिसरातील व्यक्तिमत्त्वांची ओळख आदींची माहिती या मुलांना मिळाली.
याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, सीईओ दिप्ती नाखले, दत्ता बाळसराफ, निलेश राऊत, संतोष मेकाळे, प्रा. रंजीत बायस, डॉ. अमित नागरे, भूषण काळे, प्रदीप मोहिते, अमेय पवार, रवी कांबळे, आशुतोष मोरे, अभिसरण उपक्रमाचे समन्वय आदी उपस्थित होते.