मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने रविवार दि. ६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले हे होते.
याप्रसंगी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “समाजातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी कार्य करणं हा अत्यंत आनंदाचा आणि शिकण्याचा भाग असतो. आपणाला घडविलेल्या पिढीसाठी तो कृतज्ञतेनं केलेला नमस्कार असतो.” हा ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा राज्यात सर्वत्र व प्रतिवर्षी आयोजित करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मलाताई सामंत प्रभावळकर, मा. अॅड. जयमंगल धनराज, फेस्कोमेचे अध्यक्ष मा. शरद डिचोलकर, यांची विशेष उपस्थिती होती.
यशवंतराव चव्हाण सेंटर गेली १७ वर्षे ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या मेळाव्यात दोन ज्येष्ठ पुरुष कार्यकर्ते मा. शामशेठ गांगण आणि मा. विजय विनायक औंधे तसेच दोन ज्येष्ठ महिला कार्यकर्ते मा. श्रीमती मीना आचार्य आणि मा. श्रीमती उषा झवेरी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ, परळ’ यांना सांघिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला. स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाचे मोहन कटारे यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसहित या सन्मान पुरस्काराचा स्वीकार केला.
या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ कलाकारांचा एक तासाचा सांगितिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या मेळाव्यामध्ये मा. अॅड. निर्मलाताई सामंत प्रभावळकर यांनी ‘इच्छापत्र’ या बद्दल कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठांचे समाजातील स्थान व योगदानाविषयी माहिती सांगितली. सन्माननीय खा.सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून ज्येष्ठांविषयीच्या धोरणात आवश्यक ते बदल होतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
चव्हाण सेंटरचे विधीसल्लागार अॅड. जयमंगल धनराज यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कायदा-२००७’ ची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. हेमंत टकले यांनी साहित्य क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या आठवणी जागविल्या. कुसुमाग्रज यांच्या काव्याने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. फेस्कॉमचे अध्यक्ष मा. शरद डिचोलकर यांनी सर्वांचे आभार मानले. चव्हाण सेंटरमध्ये सुरु असलेले सर्व उपक्रम पाहण्याची व्यवस्था उपस्थितांसाठी करण्यात आली होती.
या कार्यक्रमास सुमारे ३०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिप्ती नाखले यांनी केले.